

लातूर : जिल्ह्यात गेल्या महिन्यात आरक्षणाच्या कारणावरुन जीवनयात्रा संपविण्याच्या नोंदी संबंधित पोलिस ठाण्यात झाल्या होत्या तथापि यातील तीन प्रकरणांत पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सर्वांगाने तपास केला असता या जीवनयात्रा संपविण्याच्या घटना आरक्षणासाठी झाल्या नसल्याचा व जीवनयात्रा संपविण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठयाही ( नोट) बनावट असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दबाव आणून शासकीय मोबदला मिळवण्यासाठी हा बनाव रचला असून या प्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मंगळवारी (दि.७) पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली.
अधिक माहिती सांगताना तांबे म्हणाले २६ ऑगस्ट २०२५ रोजी बळीराम श्रीपती मुळे (३६, रा. शिंदगी ता. अहमदपूर) यांनी विषप्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकाने मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ लिहिलेली असल्याचा दावा करत एक चिठ्ठी पोलिसांना दिली होती. १३ सप्टेंबर रोजी शिवाजी वाल्मीक मेळ्ळे (३२, रा. दादगी ता. निलंगा) यांचा इलेक्ट्रिक शेगडीचा करंट लागून मृत्यू झाला होता. मरणोत्तर पंचनाम्यात कोणतीही चिठ्ठी सापडली नसली, तरी नंतर घरातील शर्टच्या खिशातून मिळालेल्या चिठ्ठीत महादेव कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्याचा उल्लेख होता. १४ सप्टेंबर रोजी अनिल बळीराम राठोड (२७, रा. हणमंतवाडी तांडा ता. चाकूर) हा करंट लागून मृत्युमुखी पडला. त्याच्याही बाबतीत नंतर एक व्यक्तीने बंजारा समाजाला एस.टी. आरक्षण मिळावे म्हणून जीवनयात्रा संपविली असल्याचा दावा करणारी चिठ्ठी पोलिसांना दिली होती. तीन्ही प्रकरणांची अनुक्रमे अहमदपूर, निलंगा आणि चाकूर पोलिस ठाण्यांत नोंद झाली.
ही सर्व कागदपत्रे लातूर पोलिस अधीक्षकांच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय दस्तऐवज परीक्षण विभागाकडे पाठविण्यात आली. परीक्षण अहवालानुसार तीनही प्रकरणांतील चिठ्यांवरील हस्ताक्षरे संशयितांच्या हस्ताक्षरांशी जुळत असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे पोलिसांनी संभाजी ऊर्फ धनाजी भिवाजी मुळे, माधव रामराव पिटले, शिवाजी फत्तु जाधव, नरेंद्र विठ्ठल जक्कलवाड आणि तानाजी मधुकर जाधव यांच्यावर त्या त्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याचे यावेळी पोलिस अधीक्षक तांबे यांनी सांगितले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण उपस्थित होते.
हस्ताक्षर जुळले नाही
तपासादरम्यान मृतक किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांच्या नैसर्गिक हस्ताक्षरांची तुलना संबंधित चिठ्यांशी करण्यात आली. प्राथमिक तपासात हस्ताक्षरे जुळत नसल्याचे निदर्शनास आले. पुढील तपासात चाकूर प्रकरणातील हॉस्पिटल सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून चिठ्या लिहिणारे संशयित ओळखले गेले. त्यांच्या हस्ताक्षराचे नमुने पंचासमक्ष घेतल्यानंतर चिठ्यांशी साम्य दिसून आले.