तेरणा नदीपात्रात आढळला 'त्या' विद्यार्थिनीचा मृतदेह
निलंगा : औराद शहाजानी येथील एक महाविद्यालयीन अल्पवयीन मुलगी गेल्या चार दिवसांपूर्वी तेरणा नदीपात्रावर पुस्तक, कपडे व चप्पल ठेवून गायब होती. तिचा शोध घेतला असता मंगळवारी सकाळी नदीपात्रात मृतदेह तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत औराद पोलिस ठाण्यात नोंद केली.
ममदापूर (ता. निलंगा) येथील अलपवयीन मुलगी औराद येथील एका पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत होती. ती दररोज ये-जा करत होती. दरम्यान, ती दि. ७ डिसेंबर रोजी सकाळी महाविद्यालयालगत असलेल्या तेरणा नदीच्या बॅरेजेसवर पुस्तक, बॅग, चप्पल ठेवून अचानक गायब झाली होती. वडिलांच्या माहितीनंतर पोलिसात नोंद करण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांची मदत घेत बंधाऱ्यात जाळे टाकले. मात्र, शोध लागला नाही. पाटबंधारे विभागाने सोमवारी बंधाऱ्यातील अतिरिक्त पाणी सोडून दिले. मंगळवारी सकाळी त्या मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिस प्रशासनाने नातेवाइकांच्या मदतीने पाण्यावर तरंगणाऱ्या मुलीचा मृतदेह बाहेर काढला. याबाबत औराद शहाजानी पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याचे पोलिस उपनिरीक्षक जनार्दन काळे यांनी सांगितले. पोलिसांनी संबंधित घटनेची चौकशी सुरू केली असून, औराद शहाजानी येथील अनेकांचे सीसीटीव्ही फुटेज, महाविद्यालयाचे सीसीटीव्ही पाहिले आहेत. महाविद्यालयानजीक तेरणा नदीपात्राजवळ घटनेशी संबंधित काही हाती लागते का? तिच्या मोबाइलवर आलेला शेवटचा कॉल कोणाचा होता?, शनिवारी केलेल्या प्रवासबाबातही अधिक चौकशी केली जात आहे.

