उदगीरमधील कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू ; भोपाळ प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त

Bird flue: एक किलोमीटर परिसरातील कोंबड्यांची विल्हेवाट; दहा किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन
Bird flue
प्रातिनिधिक छायाचित्रfile photo
Published on
Updated on

लातूर: उदगीर येथील रामनगरमध्ये कुक्कुट पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूचे निदान झाले आहे. भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेचा याबाबतचा अहवाल प्राप्त झाला आहे. बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी तेथील एक किलोमीटर परिसरातील कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची कार्यवाही सुरू केली आहे. याबाबत पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. तसेच आवश्यक उपाययोजना गतीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

उदगीर शहरातील कावळ्यांचा बर्ड फ्ल्यूने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर खबरदारी म्हणून शहरातली कोंबड्यांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी औंधच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते, तेथील रिपोर्ट निगेटिव्ह होता. त्यानंतर हे नमुने गोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यापैकी रामनगर येथील कुक्कुट पक्ष्यांचा बर्ड फ्ल्यू विषयक तपासणी अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रादुर्भाव क्षेत्राच्या एक किलोमीटरच्या परिसरातील देशी आणि व्यावसायिक पक्ष्यांना शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार अंडी, खाद्यपदार्थ आणि पक्ष्यांचे सर्व अवशेषही नष्ट केले जात आहेत. तसेच या परिसराच्या निर्जंतुकीकरणाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये पशुसंवर्धन , महसूल , वन विभाग, नगरपालिका, पोलीस प्रशासन, जलसंपदा, बांधकाम, भूमि अभिलेख आणि परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहेत.

10 किलोमीटर परिसर अलर्ट झोन घोषित

बर्ड फ्ल्यूचा फैलाव रोखण्यासाठी प्रादुर्भाव क्षेत्राभोवती 10 किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या झोनमध्ये नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या परीसरात निर्जंतुकीकरण करण्यासोबतच परिसरात कुक्कुट पक्ष्यांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार आहेत.

बर्ड फ्ल्यूच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत अधिकृत माहिती वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता शांतता राखावी. रोग नियंत्रणासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून नागरिकांनी पूर्ण सहकार्य करावे. आजारी पक्षी दिसल्यास अथवा कुठेही पक्ष्यांची असामान्य मरतुक झालेला पक्षी आढळल्यास तात्काळ 1962 या टोल फ्री क्रमांकावर किंवा जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news