

Be alert to avoid electrical accidents during rainy season; Appeal to the citizens of Mahavitran
लातूर, पुढारी वृत्तसेवा: पावसाळ्यात पाऊस व वादळी वाऱ्यामुळे महावितरणच्या वीजयंत्रणेला मोठा फटका बसत असतो. विजेच्या तारा तुटणे, विजेचे खांब कोसळणे, रोहित्र कोसळणे त्याचबरोबर करंट उतरणे अशा घटना घडत असतात. अशावेळी काही प्रसंगी दुर्घटनाही घडतात. त्यामुळे पावसाळ्यात होणारे संभाव्य विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळण्याचे व खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणने नागरिकांना केले आहे.
मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे तुटलेल्या फांद्या वीज वाहिनीच्या तारांवर अडकून पडल्या असल्यास त्या स्वतः काढण्याचा प्रयत्न करू नये. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला वा मोडला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. वीजप्रवाह असण्याची त्यात शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटवण्याचा प्रयत्न करू नये आणि त्वरित महावितरणशी संपर्क साधावा.
घरात बसवलेल्या मीटरवर पाणी पडत असल्यास किंवा मीटर असलेली भिंत ओली असल्यास त्वरित महावितरणशी संपर्क साधावा. विजेच्या पोलला हात लावू नये. खांबाच्या स्टेवायरला गुरे-ढोरे बांधू नयेत तसेच कपडे वाळत घालण्यासाठी स्टेवायरचा वापर करू नये. घरामध्ये असलेली विद्युत यंत्रणा व घराजवळ असलेली अर्थिग मान्यताप्राप्त कंत्राटदाराकडून तपासून घ्यावी. अपार्टमेंटच्या मीटर बॉक्सची स्वच्छता राखावी भिंतीमध्ये पाणी मुरणार नाही याची काळजी घ्यावी.
स्वीच बोर्डापासून मोटारीपर्यंत जाणाऱ्या वायरला जोड देऊ नये. घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेन स्वीच तत्काळ बंद करावा. घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अँटेना वीज तारांपासून दूर ठेवावा. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीच बोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही याची दक्षता घ्यावी.
विशेषतः टिन पत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून। विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अशा प्रसंगी खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र आणि फिडर बंद करण्यात येतो. त्यामुळे वीजपुरवठा काही कालावधीसाठी बंद होतो. अशा स्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे.
येथे करा संपर्क
शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याची माहिती देण्यासाठी वा तक्रारीसाठी २४ तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरवर संपर्क करता येईल. टोलफ्री क्रमांकाद्वारे केलेल्या सर्व तक्रारी सीआरएम सॉफ्टवेअरमध्ये नोंदविल्या जातात आणि निपटारा करण्यासाठी एसएमएस पाठवून संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्याला देण्यात येतात. यासाठी ग्राहकांनी १९१२,१८००२१२३४३५, किवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच लातूर जिल्हयाच्या ७८७५७६२०२१ या सनियंत्रण कक्षाच्या मोबाईल क्रमांकावरती संपर्क DANGER साधावा सदरील क्रमांकावरती व्हॉट्सअॅप सेवाही कार्यरत असल्याने टेक्स्ट मेसेजसह तक्रारींशी निगडित फोटोही वीजग्राहकांना शेअर करता येणार आहेत.