

जयपाल ठाकूर
औसा: प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार परवीन नवाबोद्दीन शेख यांनी भाजपच्या डॉ. ज्योती बनसूडे यांच्या 1361 मताधिक्याने विजय संपादन केला. त्यांच्या विजयामुळे औसा शहरात डॉ. अफसर शेख समर्थकांनी गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला. परवीन शेख यांच्या विजयाने औसा नगरपरिषदेच्या सत्तेच्या चाव्या आता पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस च्या हाती आल्या आहेत.
औसा नगरपरिषदेच्या एकूण 23 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने 17 जागावर विजय मिळवत एकतर्फी वर्चस्व राखले आहे. तर भाजपाला गेल्या वर्षी एवढ्याच 06 जागांवर विजय मिळवता आला. भाजपाच्या डॉ. ज्योती बनसूडे या पहिल्या फेरीत 250 मतांनी लीडवर होत्या पण दुसऱ्या फेरीपासुन परवीन शेख यांनी लीड घेत ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवले. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी भाजपच्या डॉ. ज्योती बनसुडे यांच्यावर 1361 मतांनी विजय मिळवला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या परवीन शेख यांना 13488 तर भाजपच्या डॉ. ज्योती बनसूडे यांना 11127 मते तर महाविकास आघाडीच्या मंजुषा माडजे यांना केवळ 331 मतांवर समाधान मानावे लागले. नगरसेवकपदी प्रभाग 1,3,4,5,6,9,10,11 प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले तर प्रभाग 2,7,8 भाजपा उमेदवार विजयी झाले. या विजयामुळे औसा शहराच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. अफसर शेख यांची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, आगामी निवडणुकांसाठी हा निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.