लातूर : मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण द्यावे यासह मराठा आरक्षण योध्दे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणास पाठींबा म्हणुन सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी पुकारण्यात आलेल्या बंदला लातूर शहरासह जिल्हा भरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, मराठा आरक्षणाचा बालेकिल्ला लातूर जिल्हा लातूर जिल्हा अशा घोषणानी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता.
सोमवारी सकाळी साडे आठच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समाजबांधव जमले. शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले व त्यानंतर शहरभर आंदोलकांनी मोटारसायकल फेरी काढत बंदचे आवाहन केले.
या बंदबाबत पूर्व कल्पना देण्यात आल्याने दुकाने उघडण्यात आली नव्हती. शाळा महाविद्यालये कडकडीत बंद होती. एरवी विद्यार्थीनी गजबजलेल्या ट्यूशन परिसरात शुकशुकाट होता. मार्केट यार्ड परिसरातही असेच चित्र होते.
शहराचे हद्य समजल्या जाणाऱ्या गंजगोलाईतील व्यवहार ठप्प होते. कापड़ लाईन, भुसार लाईन सराफा बाजार येथेही शुकशुकाट होता मराठा आंदोलकांच्या सतत शहरात मोटारसायकल फेल्या सुरू होत्या. गंजगोलाईतील जगदंबा मंदिरासमोर रस्त्यावरच बराच काळ मराठा बांधवांनी बैठक दिली होती. मराठा आरक्षणासाठी लोकशाही मागनि आंदोलन करुनही सत्ताधारी व विरोधी हा विषय गांर्भियाने घेत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. सरकारचा निषेध करण्यात आला. मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण द्याचे निजाम गॅझेटीअर लागू करावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आंदोलनास येताना सर्व समाजबांधवांना सोबत जेवनाचे उमे आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सर्वांनी ते आणले होते. दुपारी गंजगोलाईत सर्वांनी उबे एकत्र केले व गोपाळकाला माणून त्याचे समुह भोजन केले.
या बंदचा समारोप गंजगोलाईतील जगदंबेस आरती करुन झाला. यावेळी जंगदंबेस समाजबांधवांनी मनोज जरांगे पाटलांना उत्तम आरोग्य अन सरकारला मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देण्याची सदबुध्दी दे अशी प्रार्थना केली.