लातूर : रावणकोळा येथे दोघांचा खून; जळकोट तालुका हादरला

लातूर : रावणकोळा येथे दोघांचा खून; जळकोट तालुका हादरला

जळकोट; पुढारी वृत्तसेवा : रावणकोळा (ता.जळकोट) येथे वादावादी होऊन दोन तरुणांची निर्घृण हत्या झाल्याची घटना आज (दि. १३) रात्री 8.30 वाजता घडली आहे. या घटनेने जळकोट तालुका हादरला आहे. भावकीतीलच एका तरुणाने एकानंतर एक असे हे दोन खून केल्याची माहिती समोर आली आहे. विलास शिवाजी सूर्यवंशी वय 23 वर्षे व महेश उत्तम सूर्यवंशी वय 20 वर्षे दोघेही रा. रावणकोळा (ता.जळकोट ) अशी मयतांची नावे आहेत.

हल्ल्यानंतर जखमी झालेल्या दोन्ही तरुणांना त्यांच्या नातलगांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय जळकोट येथे दाखल केले परंतु, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता. वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मोरे यांनी त्यांचा दवाखान्यात येण्यापूर्वीच मृत्यू झाला होता असे सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी आपल्या सहकाऱ्यांसह ग्रामीण रुग्णालय तसेच रावणकोळा येथे भेट देऊन पाहणी केली.

दोन परिवारांचे भविष्य ज्यांच्यावर अवलंबून होते असे विलास सूर्यवंशी व महेश सूर्यवंशी हे दोन चुलत भाऊ हल्ल्यात गतप्राण झाल्याने सूर्यवंशी परिवाराची हानी झाली आहे. हे वृत्त लिहीपर्यंत जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला नव्हता. या दुहेरी खुनाच्या घटनेने जळकोट तालुका हादरुन गेला आहे. या हत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतरच खुनाचे कारण स्पष्ट होईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news