

Zilla Parishad Central Primary School at Wakadi in Bhokardan taluka
सादिक शेख
आन्वा : भोकरदन तालुक्यातील वाकडी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना एक वर्ग खोली कमी असल्याने विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसून शिक्षण घ्यावे लागत असून याकडे जिल्हा परिषद शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहेत.
राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा 'डिजिटल' केल्या जात असताना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षणाची सोय असून, या आठही वर्गात एकूण २१२ विद्यार्थी आहेत. तर पाच वर्ग खोल्या असून तीन खोल्यांची आवश्यक आहे.
तीन वर्गातील विद्यार्थ्यांना एकात दोन तर एका वर्गातील विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसून ज्ञानार्जन करतात. एकीकडे, राज्य शासन कमी पटसंख्येचे कारण पुढे करून शाळा बंद करीत आहे, तर दुसरीकडे पुरेशी पटसंख्या असूनही ग्रामीण विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांसारखी मूलभूत सुविधा पुरविण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यावरून शासन व प्रशासन ग्रामीण विद्यार्थ्यांच्या बाबतीत किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते.
शाळा म्हटली की वर्गखोल्या, शिक्षकांचे स्टाफरूम, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वेगळी व्यवस्था, मुख्याध्यापकाचा स्वतंत्र कक्ष, पर्यवेक्षकाची वेगळी बैठक व्यवस्था अशी यंत्रणा असते. पण जिल्हा परिषदेच्या ९० टक्क्यांहून अधिक शाळांत विद्यार्थ्यांचे वर्ग व शाळेचे व्यवस्थापन एकाच खोलीत, असा कारभार सुरू आहे.