

पिंपळगाव रेणुकाई ः भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात तीव्र उन्हाळ्यामुळे वन्यजीवांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. मे महिन्यात तापमान 41 अंशांवर गेल्याने नाले, ओढे व नैसर्गिक पूर्णपणे कोरडे पडले आहेत. त्यामुळे पाण्याच्या शोधात हरणांचे कळप मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत.
गावाच्या शिवारात शनिवारी सकाळी 20 ते 25 काळविटांचा कळप कापणी झालेल्या मकाच्या शेतात भटकताना दिसून येत आहे. पाणी व चाऱ्याच्या शोधात ही हरणे दिवसभर उन्हात तडफडत होती. परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले की, गेल्या आठवड्याभरापासून सकाळ-संध्याकाळ हरणे शेतात येत आहेत.
काही हरणे पाण्याअभावी अशक्त झाली आहेत पिंपळगाव रेणुकाई परिसर काळवीट व इतर वन्यप्राण्यांचा वावर मोठा आहे. उन्हाच्या तडाख्याने हरणे रस्त्यावर आल्याने वाहनांच्या धडकेत मृत्युमुखी पडण्याचा धोकाही वाढला आहे. वन्यजीवांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे.
पाणवठे भरा
पिंपळगाव रेणुकाईसह परिसरातील जंगलातील प्राणी पाण्यासाठी भटंकती करत आहे. प्रशासनाच्या वतीने वन्यप्राण्यांची पाण्याची व्यवस्था करावी. पाणवठे तयार करून त्यात नियमित पाणी सोडण्याची मागणी वन्यप्रेमी नागरिकातून होत आहे.