

Water supply to the residents of Jafrabad once every ten days
मुकेश भारव्दाज
जाफराबादः जाफराबाद शहरात दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन महत्त्वाचे ठरत आहे. शहरातील नागरिकांना सध्या दहा दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात आहे. शहराची तहान भागविण्यासाठी ३ एमएलडी पाण्याची गरज असताना नगरपंचायतीला दररोज २.५ एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे.
जाफराबाद शहराला पूर्वी निमखेडा येथून पाणीपुरवठा केला जात होता , तेथील जलस्रोताची पाणीपातळी कमी झाल्याने आता शहरासाठी आळंद येथून पाणी आणले जात आहे. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील विविध भागांना पाणीपुरवठा केला जात आहे.
शहरातील पाणीपुरवठ्यासाठी पाच जलकुंभांची व्यवस्था करण्यात आली आहे. या पाच जलकुंभांच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये पाणी वितरित केले जाते. सध्या दहा दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा जाफराबाद शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी ४९ कोटी रुपयांची जलजीवन योजना हाती घेण्यात आली आहे.
सुमारे एक वर्षापूर्वी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या योजनेचे भूमिपूजन करण्यात आले होते. या योजनेचे काम सध्या सुमारे ४० टक्के पूर्ण झाले आहे. योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला अधिक बळकटी मिळण्यास मदत होणार आहे.
पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज
जाफराबाद शहराला तीन एमएलडी पाण्याची आवश्यकता असून, सध्या २.५ एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना उपलब्ध पाण्याचे प्रमाण, जलस्रोतांची स्थिती आणि नागरिकांची गरज यांचा विचार केला आत आहे. दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक असून, शहरवासीयांनीही पाणी बचतीला प्राधान्य देण्याची गरज आहे.