

Uproar in the House over Mahatma Phule Market; verbal clash between Sena and BJP members
जालना, पुढारी वृत्तसेवाः शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महात्मा फुले मार्केटच्या प्रश्नावरून सोमवार, दि. ६ रोजी जोरदार गदारोळ उसळला. या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना शिवसेनेचे नगरसेवक कमलेश खरे आणि भाजपाचे नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांच्यात शा-ब्दिक हमरी-तुमरी झाली.
दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताच सभागृहात वातावरण चांगलेच तापले. गोंधळ वाढल्याने काही काळ सभागृहातील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच महापौर वंदना मगरे यांनी हस्तक्षेप करत सभा सुमारे पाच मिनिटांसाठी तहकूब केली.
दरम्यान, महात्मा फुले मार्केटमधील विविध समस्या, व्यवस्थापनातील त्रुटी आणि व्यापाऱ्यांच्या अडचणी या मुद्द्यांवरून वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सभेतील या गदारोळामुळे महापालिकेच्या कामकाजावर परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
शहरातील मस्तगड येथील मांमादेवी शॉपिंग कॉम्प्लेक्सचे नूतनीकरण करून त्या ठिकाणी मोठ्या आकाराचे गाळे बांधण्यात यावेत, जेणेकरून महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल. प्रस्ताव जालना महानगरपालिकेमार्फत महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात यावा, अशी मागणी देठे यांनी केली. यावेळी महापौर बंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, आयुक्त अंजली शर्मा आदींसह विविध समित्यांचे सभापती, सदस्य उपस्थित होते.
ओपन स्पेसवरील अतिक्रमण काढा
दरम्यान, सर्वसाधारण सभेत संध्या देठे यांनी सर्वे क्रमांक ३९६, मधुबन कॉलनी येथील काही नागरिकांनी ओपन स्पेसवर अतिक्रमण केलेले आहे. त्या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अतिक्रमण तात्काळ काढून टाकण्यात यावे. रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत पोल तत्काळ काढण्यात यावेत. शहरातील वाढती ट्रॅफिक समस्या लक्षात घेता, जालना महानगरपालिकेने पुढाकार घेऊन ट्रैफिक विभागाशी समन्वय साधावा. ट्रॅफिक विभागाशी संपर्क साधून अशा वाहनांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, आदी सूचना केल्या.