

शहागड, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील शहागड येथील छत्रपती भवन येथे आज (दि.१६) दुपारी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अचानक मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी खासदार संदिपान भुमरे उपस्थित होते. यावेळी येत्या २३ तारखेला मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली. (Uday Samant meet Manoj Jarange)
मागील २ वर्षांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. ३० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथील उपोषण सोडताना सरकारने जरांगे यांना त्यांच्या मागण्यां संदर्भात तीन महिन्यांत पुर्तता करण्याचे आश्वासन दिले होते. आता आश्वासनाची मुदत ३० एप्रिल रोजी संपत आहे. त्याआधी सामंत यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली आणि येत्या २३ तारखेला मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागण्यांसंदर्भात चर्चा करणार असल्याचे सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
मराठा समाजाचे तिन्ही गॅजेट लागू करा, कुणबी नोंदी शोधण्यासाठी वेग द्या, कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र न देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी जरांगे यांनी मंत्री सामंत यांच्याकडे केली. ते पुढे म्हणाले की, सरकारला दिलेली मुदत ३० एप्रिला संपत आहे. त्यामुळे सरकारनं मागण्या मंजूर केल्या नाहीत. तर राज्यव्यापी बैठक घेऊन मुंबईत आंदोलन करू.