

There is no record of solar power of entrepreneurs.
जालना, पुढारी वृत्तसेवा : औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये उद्योजकांनी सोलार बसवले. या सोलार द्वारे होणाऱ्या वीज निर्मितीची नोंदच महावितरण कडे नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून दुसरीकडे अव्वाच्या सव्वा वीज बिले येत असल्याने वैतागलेल्या उद्योजकांनी तीव्र संताप व्यक्त करत महावितरणच्या अभियंत्यांना धारेवर धरले. यावेळी महावितरणच्यावतीने गुत्तेदाराचे कर्मचारी विजेची नोंद घेण्यासाठी येतात. त्यात अॅप चे सर्वर डाऊन, तांत्रिक अडचणींमुळे व्यत्यय येत असल्याने स्वतंत्र पथकामार्फत स्पॉट इन्स्पेक्शन करून नोदी सूरळीत केल्या जातील, असे महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांनी दिले.
जालना लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष पंकज कासलीवाल यांच्या अध्यक्षतेखाली मासिक बैठक रविवारी (ता.०७) एका हॉटेलच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सचिन गुल्लाने, सहायक अभियंता सचिन बनकर, सहायक अभियंता हर्षल करोले, लघु उद्योग भारतीचे कोषाध्यक्ष पियुष मुंदडा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती."
उद्योगांसाठी महावितरण च्या ऑनलाईन सुविधा, मार्गदर्शक तत्वे" या विषयावर अभियंत्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने महावितरण कडून नवीन कनेक्शन, वीज पुरवठा, वीज बिलांबाबात समस्या, तक्रारींसाठी ग्राहकांनी आयडी पासवर्ड तयार करावा, सुरक्षा अनामत रक्कम, अतिरिक्त वीज मागणी साठी प्रक्रिया याबाबत चलचित्र फितींद्वारे सविस्तर माहिती दिली. सामाजिक दायित्वाच्या दृष्टीने आगामी रविवारी (ता. १४) राजेश कामड मित्र मंडळातर्फे प्रती वर्षाप्रमाणे यंदा ही आयोजित रक्तदान शिबीरात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच लघु उद्योग भारतीतर्फे आगामी फेब्रुवारी महिन्यात क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाणार असल्याचे कासलीवाल यांनी सांगितले.
सुविधांची माहिती
अध्यक्षीय समारोपात पंकज कासलीवाल यांनी " ज्ञानाचे आदान प्रदान, संघटन, सामूहिक विकासाचे प्रतीक असलेल्या मासिक बैठकीत उद्योगांना डिजिटलद्वारे अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी महावितरणच्या ऑनलाईन सुविधांबाबत माहिती मिळावी, यासाठी विशेष सत्र आयोजित केल्याचे सांगितले.