

The hunger strike of the teachers is temporarily suspended
जालना, पुढारी वृत्तसेवाः शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरील अन्यायाविरोधात दि. १४ ऑगस्ट रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले उपोषण चौकशीसाठी चार सदस्यीय समिती नेमल्याने स्थगित करण्यात आले आहे.
जुलै महिन्यातच माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले होते, पण अधिकाऱ्यांनी जबाबदारी एकमेकांवर ढकलल्यामुळे चौकशी अधांतरी राहिली. अखेर शिक्षकांच्या दबावामुळे १३ ऑगस्ट रोजी शालेय व्यवस्थापनाला मागण्या निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले; परंतु व्यवस्थापनाने स्वातंत्र्य दिनानंतरच कारवाईचे आश्वासन दिल्याने उपोषण सुरूच राहिले.
दरम्यान, मराठवाडा शिक्षक शिष्टमंडळाने संघाच्या शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती नेमण्यात आली. या समितीत मनोज कोल्हे (गटशिक्षणाधिकारी जालना), रवी जोशी (प्रभारी उपशिक्षणाधिकारी माध्यमिक), श्रीमती विनया वडजे (उपशिक्षणाधिकारी प्राथमिक) आणि शिनगारे (गटशिक्षणाधिकारी अंबड) यांचा समावेश असून, दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आश्वासनानंतर उपोषण मागे
ठोस आश्वासनानंतर शिक्षकांनी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मुख्याध्यापकावर कारवाई न झाल्यास उपोषण पूर्ववत सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. उपोषणाला संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवटे, जिल्हा सचिव संजय येळवंते, कोषाध्यक्ष नारायण मुंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व मार्गदर्शक उपस्थित होते.