

जालना ः शहरातील आंतरराष्ट्रीय तिरंदाज तेजल राजेंद्र साळवे हिने बॅकॉक ( थायलंड) येथे सुरू असलेल्या आशिया कप तिरंदाजी स्पर्धेत (कंपाउंड उमेन्स कॅटेगरी) कांस्यपदक जिंकत देशाचा मान उंचावला आहे.
आशिया कप वर्ल्ड रँकिंग तिरंदाजी स्पर्धा (स्टेज) मध्ये भारतीय महिला कंपाउंड संघाने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक जिंकले. तेजल राजेंद्र साळवे, चिकिथा तानिपार्थी आणि राज कौर यांनी उत्कृष्ट समन्वय आणि कौशल्याचे प्रदर्शन करत अंतिम फेरी गाठली आणि देशासाठी महत्त्वाचे रौप्यपदक मिळवले.
संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने अचूकता, संयम आणि उत्कृष्ट संघभावना दाखवली. कठीण सामन्यांमध्येही त्यांनी स्थिर मनःस्थिती राखत प्रतिस्पर्ध्यांना जोरदार टक्कर दिली. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत तेजलने आपली अचूकता आणि मानसिक ताकदही दाखवून दिली.
कांस्यपदकाच्या सामन्यात तिने प्रतिस्पर्ध्यावर नियंत्रण ठेवत महत्त्वाच्या क्षणी अचूक बाण सोडले आणि विजय आपल्या नावावर केला. तेजलच्या या यशामुळे भारताच्या तिरंदाजी क्षेत्रात पुन्हा एकदा अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.
तेजलच्या या कामगिरीमुळे तरुण खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळणार आहे.तेजल राजेंद्र साळवे ही सातत्याने मेहनत, शिस्त आणि समर्पण यामुळे आज या उंचीवर पोहोचली आहे. तिच्या यशात प्रशिक्षक, कुटुंबीय आणि सहकाऱ्यांचा मोठा वाटा आहे. तेजलच्या या यशामागे प्रशिक्षक प्रकाश दुसेजा, लोकेश चंद पाल आणि चंद्रकांत एलाग यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे. या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून तसेच विविध स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.
कालिका स्टीलने घेतली जबाबदारी
जालना येथील कालिका स्टीलने तेजलच्या प्रायोजकत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. या स्पर्धेसाठी तिला जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सदिच्छा दिल्या होत्या.
आपल्या देशाची मान ताट राहावी ः तेजल
आपल्या भारत देशाची मान ताट राहावी. यासाठी अजून चांगला खेळ करायचा आहे. या स्पर्धेसाठी प्रशिक्षक प्रकाश दुसेजा, लोकेश चंद पाल आणि चंद्रकांत एलाग यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी अनेक पदके जिंकून देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी मी नेहमी सातत्याने प्रयत्न करील.