हमी भावापेक्षा कमी भावात सोयाबीन विक्री; शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडुन लुट

हमी भावापेक्षा कमी भावात सोयाबीन विक्री; शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडुन लुट
soybean market price
सोयाबीनfile photo
Published on
Updated on

वडीगोद्री : अंबड तालुक्यात सोयाबीन मळणीचा हंगाम सध्या जोरात सुरू आहे. आर्थिक अडचणीमुळे शेतकरी सोयाबीन विक्री करत आहेत. मात्र हमीभावापेक्षा अर्ध्या किमतीतच सोयाबीनची खरेदी सध्या सुरू आहे. शासनाकडून सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आहे. मात्र शेतकऱ्यांकडुन खाजगी व्यापारी कवडीमोल भावाने सोयाबीनची खरेदी करीत आहेत. सोयाबीन चांगले नाही, सोयाबीन मध्ये ओलावा असल्याचे कारण सांगत खाजगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.

अंबड तालुक्यात सोयाबीन पिकाचे मोठे क्षेत्र आहे. परतीच्या पावसाने कापूस आणि सोयाबीन पिकांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील कापसाच्या वेचणीला सुरुवात झाली असून सोयाबीनची काढणी जवळपास पूर्ण होत आली आहे. शेतकरी या कामात व्यस्त आहेत. मळणी झालेले सोयाबीन शेतकरी आर्थिक गरजेपोटी विक्री करत आहेत. मात्र बाजारात सोयाबीनला २ हजार सहाशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळत असल्याने व्यापाऱ्यांकडून शेतकरी लुटल्या जात आहेत.

व्यापारी हमीभावापेक्षा अर्ध्या किमतीत सोयाबीनचे खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक कोण थांबवणार. कृषी उत्पन्न बाजार समितीचे कुठले ही नियंत्रण या व्यापाऱ्यावर नाही. बाजार समिती व पणन विभाग याकडे लक्ष देणार का हा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे. हमीभावापेक्षा कमी भावाने सोयाबीन खरेदी करणे नियमबाह्य असताना खाजगी व्यापारी नियम धाब्यावर बसवून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची लूट करीत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे हमीभावपेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी करण्याऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अतिवृष्टीने कापूस, सोयाबीन, तूर, मूग, मका या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही सरकारने अनुदानातून जालना जिल्हा वगळले आहे. अतिवृष्टी झाल्याने निसर्गान मारले, अनुदानातून वगळून सरकारने मारले आहेत.

यावर्षी तीन एकर सोयाबीन पेरले होते. पावसाने उत्पन्नावर मोठा फटका झाला. एकरी चार किंटलचा उतारा मिळाला. उत्पन्न घटले आणि बाजारात भाव ही घटला त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने कमी भावाने सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई करावी.

अभिजीत काळे, शेतकरी, वडीगोद्री

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news