

Ambad Tehsildar Attack Sand Smugglers Police Custody
शहागड : त्यांना अंबड न्यायालयात हजर केले असता पोलीस कस्टडी सुनावली. आरोपी कृष्णा अशोक दाभाडे (रा. रेवकी, ता. गेवराई, जि. बीड), विकास रामेश्वर गांडूळे (रा. गौंडगाव, ता. गेवराई, जि. बीड) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
तहसीलदार विजय चव्हाण महसूल पथकासह गोदावरी नदीपात्रात वाळू चोरांवर कारवाई करण्यासाठी गेलेले होते. यावेळी वाळू तस्करांनी चव्हाण यांच्यावर हल्ला केला. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता.
गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांच्या पोलीस पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली. या घटनेमध्ये एक विधी संघर्ष बालकाचा समावेश आहे. त्याला बाल सुधार कारागृहात पाठविण्यात आलेले आहे.
तर मुख्य संशयित आरोपी राम लांडगे (रा. गेवराई, जि. बीड) हा अद्याप फरार असून त्याचा शोध सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, इब्राहिम शेख, उपनिरीक्षक बलभीम राऊत, उपनिरीक्षक किरण हावले, जमादार रामदास केंद्रे, फुलचंद हजारे आदी करत आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक किरण हावले करीत आहेत.