

Jalna Ambad Taluka Illegal Sand Mining
शहागड: अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथील ३ वाळूमाफियांच्या सातबाऱ्यावर तहसीलदारांच्या आदेशानुसार ४१ लाख १२ हजार ६२५ रुपयांचा संयुक्त बोजा टाकण्यात आला आहे. या सर्वांचे मिळून ४ हेक्टर ७ आर एवढे क्षेत्र असून, या खातेदारांनी ७ दिवसांत दंड भरल्यास बोजा कमी करण्यात येईल, अन्यथा त्यांच्या सातबाऱ्यावर 'महाराष्ट्र शासन' असे नाव लावण्यात येणार असल्याचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंबड तालुक्यातील मठ पिंपळगाव, धनगर पिंपरी शिवारातून वेळोवेळी अवैधरित्या वाळू उत्खनन व वाहतूक करून वाळू चोरी केल्याप्रकरणी संबंधित वाळू माफियांवर एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने चौकशी करून झालेल्या उत्खननाचा पंचनामाही करण्यात आला. त्यानंतर सर्व संबंधितांना नोटीस देण्यात आल्या; परंतु त्यांच्याकडून वेळेच्या आत खुलासा सादर करण्यात आला नाही.
संबंधितांना मोठ्या प्रमाणात संधी देऊनही त्यांच्याकडून खुलासा प्राप्त न झाल्यामुळे तसेच सदरील व्यक्तीकडून चोरीचे प्रकार, अवैध रेती उत्खननाचे प्रकार न थांबल्यामुळे तसेच सदरील व्यक्ती या वाळू चोरी, वाहतूक व उत्खनन या सर्व बाबींमध्ये वारंवार आढळून आल्याने मठ पिंपळगाव येथील कार्तिक विठ्ठलराव जिगे, देविदास पांडुरंग जिगे व पंडित गंगाराम मदनुरे यांच्या सातबाऱ्यावर ४१ लाख १२ हजार ६२५ रुपयांचा संयुक्त बोजा चढवण्यात आला आहे. जोपर्यंत संबंधित खातेदार दंड अथवा बोजा क्लियर करणार नाही, तोपर्यंत त्यांच्या सातबाऱ्यावर महाराष्ट्र शासन हे नाव असेल, असे चव्हाण यांनी सांगितले.
वाळू उत्खनन व वाहतूक करून वाळू चोरी केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तींविरुद्ध तहसीलदार विजय चव्हाण यांनी अंबड पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याची कारवाई केली. त्यानंतर आता संबंधित व्यक्तींच्या सातबाऱ्यावर ४१ लाखांचा संयुक्त बोजा टाकण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे दुधना पात्रातून वाळू उत्खनन करून चोरी करणाऱ्या सर्वच वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.