

टेंभुर्णी ः ग्रामीण भागातील व खेड्यापाड्यातील वाड्यावरील वरांना वधू मिळत नसल्याने वरपिता चिंतेत आहेत. दुसरीकडे एखादी मुलगी लग्नास तयार झालीस तर तिच्यासह नातेवाईकांच्या अपेक्षा पूर्ण करताना वर पित्याची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्याची मागास तालुका म्हणून ओळख आहे. तालुक्याच्या ठिकाणी मोठे उद्योग, पर्यटन स्थळ, धार्मिक स्थळ नसल्यामुळे युवकांना रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे युवकांना शेती किंवा छोटा-मोठा उद्योग व्यवसाय करावा लागत आहे. काही तरुण शेतीला जोड धंदा म्हणून दूध व्यवसाय करुन उत्पन्न वाढण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक युवकांचे लग्नाचे वय निघून गेले आहे.
काही शेतकऱ्यांच्या मुली शेतकरी मुलासोबत लग्न करण्यास तयार नाहीत. त्यामुळे मुलांसाठी मुलगी बघाताना मुलाच्या आई-वडिलांचे जोडे झिजत आहेत. नोकरी करणारा, शहरी भागात राहणारा, स्वतःचे घर असणारा, नोकरी तसेच चांगले पॅकेज आणि स्वतःची गाडी, शेती असणाऱ्या मुलांना मुलीचे आई वडील व नातेवाईक अधिक पसंती देत आहे.
शेतकरी मुलगा नको ग बाई मला नको आशा परिस्थितीत मामाकडच्या मुलींची संख्या कमी होत गेल्याने तालुक्यातील अनेक मुले लग्नाविना आहेत. त्यामुळे वर पित्यांची चिंता वाढत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.
तालुक्यांमध्ये उच्च शिक्षण, मोठाले उद्योग, व्यवसाय यात भर पडल्यास युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. असे झाले तर या भागातील युवकांचे भाग्य उजळणार आहे.