

Rohini and Mrig Nakshatras remain dry; farmers worried
अविनाश घोगरे
घनसावंगी : जून महिना अर्ध्यात गेला आहे. रोहिणी अन् मृग नक्षत्र कोरडे गेले. खरीप हंगाम पेरणीपूर्व मशागत करून ठेवलेले शेत पावसाची वाट पाहत आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची पूर्व तयारी करून ठेवली आहे. परंतु, पावसाने ओढ दिल्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.
दरम्यान, यंदा अल निनोचा प्रभाव जिल्ह्यावर आहे. यामुळे पेरणी करताना १०० मिलीमीटर पाऊस पडे पर्यंत पेरणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. जून महिन्याचा अर्ध्याहून अधिक कालावधी उलटला असला तरी तालुक्यात अद्याप दमदार पाऊस पडला नाही. सुरुवातीला झालेल्या किरकोळ सरींमुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत करून शेत पेरणीयोग्य बनवले आहे; परंतु पुरेशा पावसाअभावी पेरणी करणे धोक्याचे ठरणार असल्याने पावसाची वाट पाहत आहे.
तालुक्यात बाजरी, मूग, तूर, सोयाबीन, कापूस आदी खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते खरेदी करून ठेवली आहे. सध्या योग्य कालावधी सुरू असला तरी पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. वेळेत पेरणी न झाल्यास उत्पादनावर परिणाम होऊन आर्थिक फटका बसू शकतो, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
सध्या शेतकऱ्यांच्या नजरा आर्द्रा नक्षत्राकडे लागल्या आहेत. या नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्यास रखडलेल्या पेरण्यांना वेग मिळू शकतो. अन्यथा खरीप हंगाम धोक्यात येण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पाऊस आणि शेती यांचे अतूट नाते असल्याने आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाच्या आशा आता येणाऱ्या काही दिवसांवरच अवलंबून आहेत.
दरम्यान, यंदाचा उन्हाळा फार उष्ण गेला. हवामान खात्याने १८ पासून पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, तो अंदाजही फोल ठरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झाले आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यंदा पेरणीचे नियोजन
जिल्ह्यात ६ लाख ४७ हजार ३०७हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड करण्याचे नियोजन अहे. त्यापैकी ३३ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचे पीक घेतले जाणार आहे. कापूस हे प्रथम क्रमांकाचे मुख्य पीक असून ४५ टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड होणार आहे. तूर, मुग, उडीद, मका, ज्वारी आदी पिकांची लागवड १ लाख ४३ हजार २३१ हेक्टर क्षेत्रावर होणार आहे.