

आन्वा ः मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भोकरदन तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील विहिरीतील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांनी जवळपास सात हजार हेक्टरवर उन्हाळी मिरची लागवड केली आहे. परंतु दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने उन्हाच्या तीव्रतेमुळे मिरचीची कोवळी रोपे करपू लागली आहेत. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना वाढत्या तापमानाचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.
मल्चिंग पेपर शेतकऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मल्चिंग पेपरच्या वापरामुळे तणांची वाढ होत नाही. तणांची वाढ होत नसल्याने खर्चात कपात होत आहे. दर्जेदार उत्पादन मिळते. यामुळे उत्पादनाला चांगला भाव मिळतो. निश्चितच या उपक्रमाचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मिरची लागवडीसाठी मल्चिंग पेपरचा वापर वाढत आहे. दरवर्षी शेतकरी मान्सूनपूर्व मिरचीची एप्रिल अखेर व मे महिन्यात लागवड करत असतो.
यावर्षी देखील शेतकऱ्यांनी मिरचीसाठी पाणी राखून ठेवत मोठ्या प्रमाणात मिरची लागवड केली आहे. परंतु मागील काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ होत असल्याने लागवड केलेली मिरचीचे कोवळी रोपे जागीच जळू लागली आहेत. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
एक रुपया सत्तर पैसे रोपाने शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली आहे. त्यात अशाप्रकारे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसू लागली आहे. मिरचीचे रोप वाचविण्यासाठी शेतकरी दिवसापासून तीन वेळा मिरचीला पाणी देऊ लागला आहे. मागील वर्षी अधिक पर्जन्यमानाचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.
दरम्यान एप्रिल व मे महिन्यात लागवड केलेली मान्सूनपूर्व मिरची जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तोडणीला येते. या काळात बाजारपेठेत मिरचीला मोठी मागणी असते. त्यामुळे जास्त भाव शेतकऱ्यांना मिळत असल्याने उन्हाळी मिरची लावण्यावर शेतकऱ्यांचा अधिकचा भर आहे. मागील वर्षी जवळपास सहा ते सात हजार हेक्टरवर मिरची लागवड करण्यात आली होती. यंदा यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु लागवड केलेल्या शेतकरी वर्गात वाढत्या उन्हामुळे भीती निर्माण झाली आहे. मिरचीचे पीक वाया जाण्याची धास्ती निर्माण झाली.
या भागात लागवड
भोकरदन तालुक्यातील आन्वा, वाकडी, कुकडी, जानेफळ गायकवाड, कारलावाडी, जळगाव सपकाळ, पारध, वालसांवगी, धावडा, हिसोडा, कोठा कोळी, करजगाव, कल्याणी, आडगाव, दहिगाव, धोंडखेडा, कोदा आदी भागांतील शेतकरी मान्सूनपूर्व मिरची लागवड करतात.