

Rain's 'Whimsical' Pattern in Jalna District
संघपाल वाहूळकर
जालना : हवामान बदलाचा थेट फटका जालना जिल्ह्याला कसा बसत आहे, याचे जिवंत चित्र गेल्या दशकभरातील (२०१५ ते २०२५) पावसाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. जिल्ह्यात कधी पावसाने सरासरी ओलांडून शेतकऱ्यांची दाणादाण उडवली, तर कधी पाणीटंचाईचे भीषण संकट उभे केले, यंदा देखील अलनिनोचे संकट राण्यावर ओढावणार असल्याने त्याचा परिणामही जालना जिल्ह्यावर होणार आहे,
दरम्यान, गेल्या १० वर्षांत २०२१ हे वर्ष जालन्यासाठी सर्वाधिक पावसाचे ठरले. ६६३.२ मिमी सरासरी असताना तब्बल १२१८ मिमी (१८३.६५%) पाऊस कोसळला. या उलट, २०१८ मध्ये जिल्हा भीषण टंचाईच्या खाईत लोटला गेला. ६७७.४ मिमी सरा-सरीच्या तुलनेत केवळ ४१८ मिमी (६१.७%) पाऊस पडल्याने खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम वाया गेले होते.
२०२० ते २०२२ या तीन वर्षात जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा दीडपट अधिक पाऊस झाला. यामुळे नद्या नाले ओसंडून वाहिले, तरी पिकांचे अतोनात नुकसान झाले. गेल्या दोन वर्षांत (२०२४ मध्ये १३४.९% आणि २०२५ मध्ये १२५.३%) पावसाने सरासरीचा टप्पा ओलांडल्यामुळे जिल्ह्याची भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत झाली आहे.
२०१५ मध्ये जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७२१.८ मिमी गृहीत धरली जात होती, ती २०२५ मध्ये घटून ६०३.१ मिमीवर आली आहे. ही पर्यावरणाच्या रष्टीने चिंतेची बाब मानली जात आहे. निसर्गाच्या या लहरी चक्रामुळे जालन्याचा बळीराजा कधी ओल्या तर कधी सुक्या दुष्काळाच्या सावटाखाली सातत्याने संघर्ष करत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.