

तळणी ः मंठा तालुक्यातील तळणी परिसराची जीवनदायींनी म्हणून पूर्णा नदीकडे पाहिले जाते. मात्र, या नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन चालू असून, शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलाला चुना लावण्याचे काम वाळू चोरांकडून होत आहे. याकडे मंठा महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड यांनी नदीपात्राची पाहणी केली.
दरम्यान, तळणी परिसरातील पूर्णा नदीपात्रातील अनेक ठिकाणचे वाळू घाटाचे शासनाकडून लिलाव करण्यात आले आहे. मात्र, लिलावाच्या व्यतिरिक्त अवैध वाळू उपसा सर्रासपणे सुरू आहे. काही ठिकाणी किनीद्वारे वाळू उपसा तर काही जेसीबी पोकलेनच्या साह्याने अवैध वाळू उपसा सुरू आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे.
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याच्या विरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यास अवैध वाळू उपसा थांबण्यास मदत होईल, असे पर्यावरणप्रेमींकडून सांगण्यात येत आहे. अवैध वाळू उपशाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड यांनी नदीपात्राची पाहणी केली. परिस्थितीची माहिती घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार अवैध वाळू उपसा ठिकाणची माहिती घेण्यासाठी पाहणी केली. परतूर व मंठा या दोन्ही तालुक्यांमध्ये अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात येणार आहे. महसूल अधिकारी येतात. त्यावेळी वाळू चोराची यंत्रणा सतर्क होते. यावरही उपाययोजना करण्यात येईल.
पद्माकर गायकवाड, उपविभागीय अधिकारी परतूर