

Police raid gambling den in Forestry Department at midnight
जालना, पुढारी वृत्तसेवा : सेंट मेरी शाळेसमोरील वनीकरण विभागातील मोकळ्या जागेत मध्यरात्रीच्या सुमारास स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळणाऱ्या ६ जणांच्या टोळीवर सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने मध्यरात्री दीड वाजता धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी नगदी, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण २७,५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शेख मो. अजीम गुलाम दस्तगीर हे रविवार, दि. १५ रोजी रात्री डी. बी. पथकासह गस्तीवर होते. मध्य रात्री १२:४३ वाजता स्टेशन डायरीची नोंद करून गस्त घालत असताना, सेंट मेरी शाळेसमोरील वनीकरण विभागातील मोकळ्या जागेत काही इसम गोलाकार बसून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी 'झन्ना मन्ना' (तीर्रट) नावाचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक सानप आणि त्यांच्या पथकाने पंचांना सोबत घेऊन रविवारी पहाटे १:२० वाजेच्या सुमारास त्या मोकळ्या जागेवर छापा टाकला. पोलीस आल्याचे लक्षातताच गोंधळ उडाला, परंतु पोलिसांनी ६ जणांना रंगेहात ताब्यात घेतले.
या प्रकरणी पोलीस हवालदार शेख मो. अजीम यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ च्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार रामादेवी अर्जुनसिंग ठाकुर करत आहेत.