

Partur Jawahar Navodaya Vidyalaya Ragging Case
परतुर, पुढारी वृत्तसेवा : येथील जवाहर नवोदय विद्यालयातील शिस्तीचा बुरखा काही विद्यार्थ्यांच्या मुजोरपणामुळे उघडकीस आला आहे. अकरावीच्या काही विद्यार्थ्यांनी नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला रॅगिंगच्या नावाखाली अमानवीय शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचा आरोप समोर आला आहे. रॅगीगच्या त्रासामुळे संबंधित विद्यार्थी खचला असुन त्याने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे पालकाचे म्हणने असून त्यांनी या प्रकरणी नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आणि परतूर पोलिसात तक्रार केली आहे.
तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की त्यांचा मुलगा हा जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून शाळेतील अकरावीच्या काही विद्यार्थ्यांनी सदर मुलाला लक्ष्य केले आहे. त्याला मारहाण करणे, कपडे धुवायला लावणे, सतत टिंगल-टवाळी करणे आणि अपमानास्पद वागणूक देणे, असा प्रकार सर्रास सुरू असल्याचे पालकांनी तक्रारीत नमूद केले आहे.
शाळेत केवळ आपल्याच मुलालाच नाही, तर इतरही अनेक विद्यार्थ्यांना असाच त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी पालकांनी अनेकदा शाळा प्रशासनाकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्राचार्य आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी या तक्रारींची दखल न घेता त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. २ जुलै रोजी शाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा ३ जुलैपासून या रॅगिंगला अधिक सुरुवात झाली. यामुळे माझ्या मुलाला मोठा मानसिक धक्का बसला असून तो नैराश्यात गेला आहे. आपल्या मुलाचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात असल्याचे पाहून पालकांनी अखेर आक्रमक पवित्रा घेतला आहे.
पीडित मुलाच्या पालकांनी या प्रकाराविरोधात केवळ शाळा प्रशासनाकडेच नव्हे तरे पोलीस निरीक्षक परतूर यांच्याकडे तक्रार केली आहे. यापुढे केंद्रीय शिक्षण मंत्री आणि पंतप्रधानांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई करून निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पालकांत चिंता
एकीकडे शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध करण्याचे ध्येय ठेवले असताना, दुसरीकडे याच शाळेच्या आवारात असा प्रकार घडत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आता यावर शाळा प्रशासन आणि शिक्षण विभाग काय कारवाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.