

Notice to Samruddhi Sugars for FRP amount of Rs. 13.5 crores
जालना, पुढारी वृत्तसेवाः घनसावंगी तालुक्यातील रेणुकानगर येथील समृध्दी शुगर्स लि. या साखर कारखान्याकडे गाळप उसाचे थकीत असलेले एफआरपीचे तेरा कोटी त्रेसष्ठ लाख बेचाळीस हजार रुपये कारखान्याची विना तारण संपत्ती ताब्यात घेऊन त्याचा लिलाव करून पैसे देण्याचे आदेश साखर आयुक्त सिध्दाराम सालीमठ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
घनसावंगी तालुक्यातील समृध्दी साखर कारखान्याच्या २०२४-२५ च्या गळीत हंगामातील गाळप उसाचे तेरा कोटी त्रेसष्ठ लाख बेचाळीस हजार रुपये कारखान्याने ऊस गाळप केलेल्या शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर पुणे येथील साखर आयुक्तांनी एफआरपी रकमेवर १५% दराने देय होणारे व्याज देण्यासह एफआरपीची रक्कम कारखान्याकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस आदी उत्पादनाची विक्री करून त्यामधून सदर रक्कम वसूल करावी.
साखर साठा बँकेकडे तारण असल्यास तारण नसलेली कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्ता जप्त करून सदर मालमत्तेवर दस्तऐ वजामध्ये शासनाच्या नावाची नोंद घ्यावी. सदर मालमत्तेची जप्ती करून त्याची विहित पध्दतीने विक्री करून या रकमेतून देयबाकी रक्कम देण्यात यावी. संबंधितांना विलंबित कालावधीसाठी १५% व्याजासह अदा करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशात दिले आहेत.
साखर आयुक्तांनी यापूर्वी स्वर्गीय अंकुशराव टोपे समर्थ सहाकारी साखर कारखाना युनिट १ व सागर युनिट २ यांनाही एफ. आर.पी.च्या बाकीसाठी नोटीस बजावली आहे. ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे पैसे कारखान्याकडे जमा असतानाही ते मिळत नसल्याने अंबड, घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण दिसत आहे.