

आन्वा : मागील वर्षी भोकरदन तालुक्यात अवकाळी पावसाने सरासरीपेक्षा जास्त भूजल पातळीत वाढ झाल्याने बहुतांश शेतकरी गव्हाचे उत्पादन घेत आहेत, त्यातच अवकाळीपासून बचाव झाला व शिवाय पोषक वातावरणामुळे यंदा गव्हाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यापासून मार्केटमध्ये नव्या गव्हाची आवक सुरू झाली आहे. पुढील महिन्यात आवक वाढण्याची शक्यता आहे. शिवाय मध्यप्रदेशसह अन्य राज्यांतील गव्हाचीही बाजारात आवक होण्याची शक्यता आहे.
तालुक्यात यंदा १८ हजार हेक्टरमध्ये उच्चांकी क्षेत्रात गव्हाचा पेरा आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा जास्त गव्हाचे उत्पादन होणार आहे. गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी गव्हाचा पेरा केला आहे. वातावरणही पोषक राहिल्याने यंदा चांगल्या उत्पादनाची आशा आहे. दरम्यान यंदा सरासरीपेक्षा अधिक गव्हाचे उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे यावर्षी गव्हाला २५८५ रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे. किंबहुना यापेक्षा जास्त दर मिळण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान रब्बी गव्हाचा हंगाम आता सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर हमी दराइतकाच भाव बाजारात मिळत आहे. आवक वाढल्यास भाव पडणार का याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
यंदा तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त अवकाळी पाऊस झाल्याने रब्बी पिकांना प्रामुख्याने गव्हाला चांगला फायदा होत आहे. पोषक वातावरणामुळे दरवर्षीपेक्षा यंदा गव्हाचे उत्पादन अधिक होऊन शेतकऱ्यांना फायदा.
आधुनिक तंत्रज्ञान, मिश्र खतांचा वापर, पोषक वातावरण आणि निसर्गाने दिलेली साथ यामुळे यावर्षी गव्हाची उत्पादकता वाढणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. शिवाय रब्बीसाठी यावर्षी वातावरणही पोषक आहे. सध्या बाजारामध्ये नव्या गव्हाची आवक कमी आहे. गव्हाची आवक परराज्यातूनही होते. गव्हाच्या प्रतवारीनुसार त्याचे दर आहेत.