

जालना : जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी, त्यामुळे उशीराने झालेली मोसंबीची तोड, खराब झालेला माल, वाढलेली थंडी, पंजाबातुन वाढलेली मोसंबीची आवक या सर्व कारणांमुळे जालना मोसंबी बाजारात मंगळवारी मोसंबीचे भाव गडगडल्याचे पहावयास मिळाले. ५ हजारापासुन १५ हजारापर्यंत मोसंबीची विक्री झाली. गतवर्षी याच काळात मोसंबीचे भाव ३० ते ३५ हजार रुपये टन होते.
जालना मोंढ्यात दररोज १५० टन मोसंबीची आवक होत आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोसंबीचा दर्जा खालावला आहे. उशीराने मोसंबी तोडण्यात आल्याने पिवळी मोसंबी बाजारात अधिक येत आहे. मोसंबीचे भाव गडगडल्याने मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना अत्यंत कमी भावात मोसंबी विकावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांचा तोडणी व वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. गतवर्षी याच काळात मोसंबीचे भाव ३० ते ३५ हजार रुपये टन होते. या वर्षी ते १५ हजारावर गडगडले आहेत. जालना मोंढ्यातुन दररोज चार ते पाच ट्रक मोसंबी उत्तर प्रदेश, कानपुर, दिल्ली व कलकत्ता येथे पाठवली जात आहे. पिवळी मोसंबी स्थानिक ज्युस विक्री करणारे खरेदी करतांना दिसत आहे.
सध्या चांगली थंडी पडत असल्याने मोसंबी ज्युस पिणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पिवळ्या मोसंबीला म्हणावी तशी मागणी नसल्याचे सांगण्यात येत आहे. मोसंबीच्या भावात झालेल्या घसरणीमुळे मोसंबी उत्पादक प्रचंड अडचणीत सापडले आहे. मोसंबी विक्री केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्या ऐवजी खिशातुन पैसे जात असल्याचे चित्र आहे. मोसंबीचे भाव गडगडल्याने मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोसंबी पिक आमदनी आठ्ठाणा खर्चा रुपया ठरत आहे.
अंबड तालुक्यातील धनगर पिंप्री येथील कैलाश नरोडे यांनी ६ क्विंटल ६० किलो मोसंबी बाज-ारात विक्रीसाठी आणली होती. या मोंसबीला १०० रुपयांचा भाव मिळाला. त्यात ९० रुपये हमालीचा खर्च वजा करता त्यांच्या हातात केवळ दहा रुपयाचा क्वाइन देण्यात आला. सदर शेतकऱ्याला मोंढ्यात मोसंबी नेण्यासाठी ६०० रुपयांचे वाहन भाडे खिशातुन द्यावे लागले.