Maratha Reservation | वडीगोद्रीत मराठा-ओबीसी कार्यकर्ते आमने-सामने

मनोज जरांगे यांची प्रकृती आणखी बिघडली; मंत्र्यांच्या विनंतीनंतर उपचार सुरू
Maratha Reservation agitation
वडीगोद्री : अंतरवाली सराटी फाट्यावर मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर पोलिसांची अशी भिंत उभी करण्यात आली. (छाया सुरेश काळे)Pudhari
Published on
Updated on

वडीगोद्री : मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांची प्रकृती पाचव्या दिवशी अधिकच बिघडल्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी मराठवाड्यातील शेकडो कार्यकर्ते अंतरवाली सराटीकडे निघाले तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण बचावासाठी याच गावात बसलेले प्रा. लक्ष्मण हाके व मंगेश ससाणे यांचे समर्थकही मोठ्या संख्येने आल्यामुळे अंतरवाली आणि लगतच्या वडीगोद्री गावात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी पांगविल्यानंतर कार्यकर्त्यांनी धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको केल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री मंत्री दीपक केसरकर आणि शंभुराज देसाई यांनी १-२ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन फोनवरून दिल्यामुळे जरांगे यांनी उपचार घेण्याची तयारी दर्शविली.

वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आरक्षण समर्थक आमने-सामने आले आणि त्यांनी घो- षणाबाजी सुरू केली. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासूनच तणाव निर्माण झाला. बंदोबस्तासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, पोलिसांनी दोन्ही गटांची समजूत काढून कार्यकर्त्यांना पांगविले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे.

सरकार मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबात कोणताही निर्णय घेत नसल्याच्या संतापातून मराठा आंदोलकांनी वडीगोद्रीजवळ धुळे-सोलापूर महामार्गावर काही वेळ रास्ता रोको आंदोलन केले. वडीगोद्री ते अंतरवाली सराटी या दोन किलोमीटर अंतरात तीन उपोषणे सुरू आहेत. अंतरवालीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, तसेच सगेसोयरे अंमलबजावणी होण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी १७ सप्टेंबर या मराठवाडा मुक्तिदिनाच्या मध्यरात्री सहाव्यांदा उपोषण सुरू केले.

दुसऱ्या दिवशी (दि. १८) अंतरवालीच्याच सोनियानगर भागात मंगेश ससाणे यांच्यासह त्यांच्या पाच सहकाऱ्यांनी ओबीसी आरक्षण बचावासाठी उपोषण सुरू केले. त्यापाठोपाठ १९ सप्टेंबरला प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनीही ओबीसी आरक्षण बचाव दुसऱ्यांदा अंतरवाली फाट्यावर, वडीगोद्री येथे उपोषण सुरू केले आहे.

तीन उपोषणांमुळे शेकडो कार्यकर्ते परिसरात दाखल झाले आहेत. त्यांच्या घोषणाबाजीमुळे वातावरणात तणाव निर्माण झाला. शुक्रवारी रात्री पोलिसांनी रस्ता अडविल्याने तणावात भर पडली. जरांगे पाटील यांनी रस्ता मोकळा करण्याचे आवाहन केले. शनिवारी गर्दी वाढल्याने पुन्हा तणाव वाढला. पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक पोलिस उपविभागीय अधिकारी, यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा तसेच राज्य राखीव दलास सकाळपासून तैनात करण्यात आले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी वादविवाद टाळण्यासाठी प्रयत्न करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मराठा संयोजकांनी छत्रपती संभाजीनगर-बीड राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्रीतून डाव्या कालव्यावरून वाहतूक वळून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मदत केली. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाजवळून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे जाणाऱ्या गाड्या वळवण्यावर एकमत झाल्याने वादविवाद टळणार असल्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले.

हा केंद्राचा अधिकार : हाके

दरम्यान, राज्य सरकारला आरक्षण देण्याचा कोणताही अधिकार नाही हा केंद्राचा अधिकार आहे. संसदेचा अधिकार मुख्यमंत्री यांच्याकडे वर्ग झाला आहे का? राणे समिती, गायकवाड आयोग, खंडपीठाने दिलेले आदेश वाचले आहेत का? फडणवीस म्हणतात तसे ओवीसी भाजपचा डीएनए असेल तर समाजिक न्यायाची भूमिका घ्या. आता त्यांचे ओबीसींकडे दुर्लक्ष झाले आहे. फडणवीस, आम्ही काय केलं याच आम्हाला उत्तर द्या. एकही मायेचा लाल तुमच्या मदतीला येणार नाही, अशी टीकाही प्रा. हाके यांनी केली.

मनोज जरांगे यांचा संताप

पोलिसांनी कार्यकर्त्यांची वाहने अडविल्याचे लक्षात येताच मनोज जरांगे म्हणाले, अंतरवालीत तुम्ही लोकांना येऊ देत नाही, तुमच्या बापाचा रस्ता आहे का? भुजबळ, फडणवीस यांना दंगली घडवायच्या आहेत. मराठ्यांना शिवीगाळ करणाऱ्या पोलिसाला बडतर्फ करा, अशी मागणी त्यांनी केली. प्रा. लक्ष्मण हाके यांना उद्देशून ते म्हणाले, लोकशाहीने अधिकार दिला आहे, त्यानुसार आंदोलन करा, पण तुम्ही रस्ता अडवणार का? आमच्यामुळे तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, असे मनोज जरांगे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, ओबीसी व मराठा आंदोलकांमध्ये तणाव वाढत आहे यावर बोलताना ते म्हणाले की, तिकडे पंढरपूरला काही तरुण आंदोलन करत आहेत. आम्ही तिथे बाजूला जाऊन बसलो तर चालेल का? त्यांना मएसटीफ्तून आरक्षण देऊ नका म्हटलं, तर चालेल का? पण आम्ही फुकट भांडण विकत घेत नाही. आता मला सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी पाहिजे, मी ७ दिवसांपासून राजकीय भाषा बंद केली. आता फडणवीस यांनी तीन-चार दिवसांतच अंमलबजावणी करावी. राजकारणाशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही. अन्याथा निवडणुकीत मराठ्यांचं पोर ऐकणार नाही. फडणवीस म्हणतात जरांगे विरोधकांचा निवडणुकीत फायदा करून देतात, मग तुम्ही आमचा फायदा करून दिला नाही तर आमचा फायदा त्यांनाच होणार. मी माझा जीव पणाला लावलाय. फडणवीस यांना संधी दिलीय, हे मराठा समाज बघतोय. आरक्षण दिलं नाही तर फडणवीस दोषी असल्याचा संदेश जाणार आणि मराठा समाज तुमचा खेळ खल्लास करणार, असेही ते म्हणाले.

विविध ठिकाणी बंद आहे. मी कुणालाही काहीही प्रोग्राम दिलेला नाही. समाज बंद करणार असेल तर मी काय करू? आम्ही १३ महिने आंदोलन केलं, एवढं आंदोलन असतं का? शांततेत बंद करा, आरक्षण कसं देत नाही ते आपण बघू.

मुंडे, भुजबळांमुळे 'ते' आंदोलन

'ते' आंदोलक परळी आणि भुजबळांमुळे आंदोलनाला बसले आहेत, हे वडीगोद्रीतील लोकांच्या लक्षात आलं आहे. भुजबळ धनगर, मराठ्यांत भांडण लावत आहे. मराठ्यांनी धनगरांच्या आरक्षणाला विरोध केला तर मग तुम्ही आमच्या अंगावर या. बळजबरीने आमच्यात भांडण लावू नका, असे जरांगे म्हणाले. आम्ही ओबीसीतून आरक्षण मागत असलो तरी तुम्हाला काहीही फरक पडणार नाही. मात्र, धनगरांनी असाच विरोध केला तर तुमच्या आरक्षणाला आम्हीही विरोध करू शकतो.

शंभुराज देसाईंची विनंती

शुक्रवारी मध्यरात्री मंत्री दीपक केसरकर आणि शंभुराजे देसाई यांच्याशी बोलणं झालं. त्यांनीं १, २ दिवसांत काही निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं म्हणून एक सलाईन लावलं, असे जरांगे म्हणाले. आम्हाला राजकारणाशी काहीही देणं घेणं नाही, पण आरक्षण दिलं नही तर तुमचं गणित बिघडवणार, असा इशाराही त्यांनी दिला.

बीड, धराशिव बंद

मनोज जरांगे यांचे उपोषण गांभीयनि घेऊन सरकारने ते थांबवावे, या मागणीसाठी शनिवारी बीड, धाराशिव आणि जालना जिल्हयाच्या काही भागांत बंद पुकारण्यात आला. त्यामुळे बीड आणि धाराशिव जिल्ह्यांच्या अनेक तालुक्यांतील व्यवहार बंद राहिले. बीडमध्ये फक्त शैक्षणिक संस्था आणि वाहतूक सुरू होती. बाजारपेठा पूर्णपणे बंद राहिल्या. रविवारी याच मागणीसाठी नांदेड बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, बीड, नादेड आणि छत्रपती संभाजीनगरहून शेकडो कार्यकर्ते अंतरवालीकडे रवाना झाले आहेत.

केंद्राने चौकशी करावी

खोक्यांचा प्रश्न काय आहे, हे जरांगे यांना विचारा. रात्रीस खेळ चालत आहे, तोही बंद दाराआड. एखादा मंत्री आला नाही तरी ते इव्हेंट करतात. खोक्यांच्या जिवावर हे सगळे चालू आहे, असा आरोप प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला. ते म्हणाले, केंद्राने आंदोलन चालविणाऱ्यांची ईडी, सीबीआयमार्फत चौकशी करावी. एक आंदोलन किती खोक्यात जाते, याचा शोध घ्यावा.

प्रा. हाके यांचे टीकास्त्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर माझा आरोप आहे की, तुम्ही घटनेशी द्रोह करत आहात. घटनेची तत्त्वे तुम्ही पाळत नाहीत. ओबीसी बांधव यांना फक्त शाखाप्रमुखांसाठी लागतात. मात्र, दारूचे गुत्तेदार, दोन नंबरचे धंदे करणाऱ्या माणसांना आमदार, खासदारकीची तिकिटे देतात आणि सामाजिक न्यायाची तुम्ही काय भाषा बोलता ? असा सवाल ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी वडीगोद्रीत बोलताना केला.

ओबीसींची भाषा येत नाही. त्यांच्यावर आरोप करणं मला वावर्ग वाटत नाही. रात्री इथून झुंडी जायच्या. त्यांनी घोषणा दिल्या की मग अॅक्शनवर रिअॅक्शन सुरू झाली. छत्रपती संभाजीनगरच्या खासदारांकडे दारूचे किती धंदे आहेत? संदीपान भुमरे यांची काय स्पेशालिटी आहे ? दोन नंबरचा धंदाच आहे ना? मुख्यमंत्री तुमचा सहकारी, तो आमच्या प्रश्राबद्दल काय बोलेल ? भुमरे संसदेत काय बोलतील? धनगर वेगळा कसा आहे? धनगर समाज ओबीसीतून साडेतीन टक्के आरक्षण घेतो, तो ओबीसीतून वेगळा कसा, असा सवाल त्यांनी जरांगे यांना केला.

मराठा मागास अहवाल कुठेही दिसत नाही. याचे उत्तर मुख्यमंत्री आणि कुणाकडेही नाही. कोणताही आयोग आणा, खरा कुणबी गोव्यात एसीमध्ये असल्याचे प्रा. हाके म्हणाले. जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, कायद्याचं राज्य आहे. तू हिटलर आहे का ? गुंडांचे राज्य आहे का? तू आंदोलन करतो तेव्हा लोकांना त्रास होत नाही का? काही घडेल तेव्हा पोलिस बघून घेतील, असे प्रा. हाके म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news