

Maratha protester Manoj Jarange called a meeting of community members in Antarwali Sarati
वडिगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या २९ जुलै रोजी अंतरवाली सराटीत सामाजबांधवांची एक बैठक बोलावली असून त्यांनी समर्थकांना हा निरोप पोहचवला आहे. अंतरवाली सराटीत बुधवारी सकाळी १० वाजता समाजबांधवांना हजर होण्यास मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे या २९ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण समाजबांधवांचे लक्ष लागले आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी नुकतीच दिल्लीतील जंतरमंतर येथे जाऊन कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला आपला पाठींबा जाहीर केला होता. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजबांधवांना येत्या २९ जुलै रोजी आंतरवाली सराटीत बोलावले आहे.
मनोज जरांगे यांनी सरसकट कुणबींना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी नुकतेच उपोषण केले होते. सरकारच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची भेट घेत त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक असल्याचे म्हटले होते. मात्र सरकार दरबारी हा तिढा असून सुटलेला नाही. सरकार जरांगे यांनी पुन्हा मे महिन्यात अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भर उन्हात उपोषणाला सुरूवात केली होती. त्यांनी उन्हात बाज टाकत त्यावर उपोषण सुरू केले होते.
ज्या बांधवांच्या ५८ लाख नोंदी सापडल्या, त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे. या प्रमाणपत्राला व्हॅलेडीटी द्यावी, विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून दर १५ दिवसांनी आढावा घ्यावा, ५८ लाख नोंदीचे प्रमाणपत्र न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी अशा मागण्या या उपोषण केले होते.
बैठकीत नेमके काय ठरणार ?
संपूर्ण मागण्या जर सरकारकडून पुर्ण न झाल्यास २९, ऑगस्ट आंदोलनला तीन वर्षे पूर्ण होत असल्याने पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी २९ जुलै रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजबांधवांची एक बैठक बोलावली आहे. जरांगे पाटील यांच्या टीमकडून राज्यभरातील मराठा बांधवांना या बैठकीसाठी निरोप देण्यात आला आहे. या बैठकीत जरांगे पाटील आंदोलनाची पुढील दिशा ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंतरवाली सराटी येथे बुधवारी होणाऱ्या बैठकीत जरांगे काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महराष्ट्राचे लक्ष लागले आहे.