भाजपमधील अनेक जण मला गुपचूप येऊन भेटतात : मनोज जरांगे
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : भाजपमधील इच्छुक उमेदवार गुपचूप येऊन मला भेटत आहेत. भाजपच्या अनेक लोकांनी माझ्याकडे उमेदवारी मागितली आहे. या निवडणुकीत आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवारांना पाडणार आहोत. विधानसभा निवडणूक लांबणीवर टाकली, तरी सरकारबद्दल लोकांची मानसिकता बदलू शकत नाही, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज (दि.१९) अंतरवाली येथे पत्रकार परिषदेत सांगितले. (Manoj Jarange News)
...तर विधानसभा निवडणुकीत फटका बसणार
ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस तुम्ही मराठ्यांची जी फसवणूक केली, त्याचा सर्वात मोठा फटका विधानसभा निवडणुकीत बसणार आहे. मराठ्यांच्या विरोधात गेल्याने पुढचा पश्चाताप टाळायचा असेल, तर मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. मी राजकारणात उतरलो, तर तुमच्या हातातील वेळ निघून गेलेली असेल. तुम्ही कोणत्याही योजना राबवा, परंतु आम्हाला आयुष्यभराच्या सोयी- सुविधा हव्यात. लाडकी बहिण योजनेमुळे राज्य सरकारला फायदा होणार नाही, तर समाजाला आरक्षण दिले तरच फायदा होईल, असे ते म्हणाले. (Manoj Jarange News)
५०० ते ६०० पेक्षा अधिक इच्छुकांचा माझ्याकडे डाटा
विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ५०० ते ६०० पेक्षा अधिक इच्छुकांनी माझ्याकडे डाटा दिला आहे. मराठ्यांनी सगळ्या पक्षाच्या उमेदवारांना पाडून गरिबांना निवडून आणून आपली ताकद यावेळी दाखवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. इच्छुकांचा डाटा देण्यासाठी वेळ वाढवून देणार नाही, असेही जरांगे म्हणाले.
एमपीएससी परीक्षेत जात प्रमाणपत्राची मुदत वाढवा
सरकारने एमपीएससी परीक्षेत जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत कमी ठेवली आहे. ही मुदत सरकारने वाढवून द्यायला हवी. ही मुदत वाढवून 6 महिने करायला हवी. तसेच एमपीएससी आणि कृषी विभागाच्या होणाऱ्या परीक्षा एकाच दिवशी न घेता वेगवेगळ्या घ्याव्यात, अशीच सर्व भरती प्रक्रिया राबवावी, असेही जरांगे म्हणाले.

