

जालना : मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास महायुती सरकार सत्तेत येऊनही त्यांना आनंद मिळू देणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला. जरांगे यांचा मुलगा जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याला भेटण्यासाठी जरांगे आले असता जालना माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
मराठा समाज जेवढा समजदार तेवढाच आक्रमक आहे. कोणीही आले तरी आरक्षणासाठी लढाई करावी लागणार आहे. आमच्या लेकरांना आम्हाला अधिकारी करायचे आहे. या पुढील उपोषण सरकार स्थापन झाल्यावर जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारे आहे. नवीन सरकार कोणाचेही येऊ त्यांना शुभेच्छा आहेतच. अवकाळी पावसाने शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
महायुती सरकारने लाडक्या बहिणींना पैसे दिले. आता शेतकऱ्यांना नुकसानीचे पैसे न मिळाल्यास रूमणे हातात घेऊन नुकसान भरपाई मागणार आहे. मराठ्यांशिवाय राज्यात कोणाचीही सत्ता येणार नाही. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास गावागावांतील मराठे या सरकारमधील लोकांना जाब विचारणार आहेत, असे जरांगे म्हणाले.