वडीगोद्री : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी संपुर्ण राज्यामध्ये रणधुमाळी सुरु आहे. या धर्तीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी मोठी घोषणा केली आहे. आंतरवली सराटी येथे बोलताना ते म्हणाले, जिथे मराठा समाजाच्या उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे तेथेच उमेदवार देऊ. तसेच राहिलेल्या ठिकाणी दुसरा उमेदवार देऊन इतर जागा पाडण्यावर भर देणार असे ते बोलले आहेत. तसेच मराठा समाजाला संपवण्याचे कारस्थान करणाऱ्यांना आम्ही या निवडणूकीमध्ये संपवू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. Maharashtra Assembly Election
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना ते म्हणाले की, इंग्रज बाहेरचं होते तुम्ही आमचे हिंदू असतानादेखील इतकं क्रुर का आहात? देवेंद्र फडणवीस सारखा माणूस पाहिला नाही. आम्हाला संपवायला निघाले आहेत.पण आम्ही त्यांना संपवण्यासाठी तयार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. आता समाजाच्या हिताचा निर्णय घ्यावा लागेल. सगळ्यांची भावना उमेदवार उभे करण्याची आहे. समाजाचा मी चौफेर विचार केला आहे.त्यामुळे सावधगिरीची भूमिका आम्ही घेतली आहे. जिथे मराठ्यांचे उमेदवार निवडून येतील तिथे मराठा उमेदवार उभा करणार. त्यासाठी जातीची समीकरणे जुळवावी लागणार आहेत. जिथे उमेदवार उभे करायचे नाहीत तिथे आमच्या विचाराशी साधर्म असलेल्या उमेदवाराने बाँड वर आमच्या मागण्याशी सहमत असल्याचे लिहून द्यावे. अर्ज मागे घेताना उमेदवारांना कळवले जाईल, कुणाचा अर्ज कायम ठेवायचा आणि कुणाचा मागे घ्यायचा हे जाहीर केले जाईल. ज्याने सांगूनही अर्ज मागे घेतला नाही,त्याने पैसे खाल्ले असं जाहीर केलं जाईल.
अर्ज माघारी घेण्याच्या तारखेआधी राज्यातील किती मतदार संघ लढवायचे आणि कोणत्या ठिकाणी कोण माघार घेणार हे मी जाहीर करणार आहे. मला निवडणूक महत्वाची नाही माझ्या समाजाची शान महत्वाची आहे. राज्यातील कोणत्या मतदार संघात मराठा समाजाचा उमेदवार निवडून येऊ शकतो. हे समाजाच्या लोकांनी अंतरवालीत येऊन मला सांगावे, तिथे मी विचार करेन. गावात मतदान फुटू देऊ नका,वाद करू नका,मतदान बूथ कॅप्चर करू देऊ नका.आम्ही डोके लावून त्यांचा भुगा करणार, असा नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांना इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला. आम्हाला काही ठिकाणी उमेदवार पाडावे लागणार काही ठिकाणी एस.सी, एस.टी. उमेदवार निवडून आणावे लागणार आहे.आमच्याकडुन अपक्ष म्हणून निवडून आलेला आमदार पळून गेला किंवा कुणाला जाऊन मॅनेज झाला तर त्याला बघून घेऊ असा, इशारा त्यांनी यावेळी दिला.
१) राज्यातील ज्या मतदार संघातून मराठा उमेदवार निवडून येऊ शकतो तिथे अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवणार,जातीची समीकरणे उमेदवार निवडून येण्यासाठी जुळवणार.
२) राज्यातील आरक्षित जागेवर एस.सी, एस.टी. च्या जागेवर जो उमेदवार आमच्या मागण्याशी सहमत आहे असे बॉण्डवर लिहून देईल तिथे त्याला मराठा समाज मतदान करणार.
३) जिथे आम्हाला उमेदवार उभे करायचे नाहीत तिथे आमच्या विचाराशी साधर्म असलेल्या उमेदवाराने बाँड वर आमच्या मागण्याशी सहमत असल्याचे लिहून द्यावे,त्याला आम्ही मतदान करू.