वडीगोद्री : माझ्या समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही. मी योग्यच करणार आहे. मराठा समाजाने मुलगा म्हणून माझ्यावर विश्वास ठेवावा. शांत राहावे. मी इमानदार रक्त आहे, बेइमानी करणार नाही. टेन्शन घ्यायचे नाही, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
मराठे ६ कोटी आहेत, पण तरीही केवळ पाच-दहा आमदार निवडून आले नसते तर समाजाने खाली मान घालून जाणे मला सहन झाले नसते. आम्ही निर्णय काय एवढा वाईट घेतलाय ? निवडणूक लढवायची नाही. संपला विषय. आमचा काही राजकारण हा खानदानी धंदा नाही. आम्ही राजकारणासाठी आलो का? मला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे, हाच आमचा मूळ उद्देश असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांना, कुणाला पाडणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी ते होईल ना, दोन-दोन दिवसांत समाधान होईल ना. मी काहींना काही दिशा सांगणार आहे. जो बॉन्ड देईल, व्हिडिओग्राफी देईल त्यावरसुद्धा काही अपक्षांनी फॉर्म ठेवलेले आहेत. ते मला आज कळायला लागले आहे. काहींनी त्या जीवावर फॉर्म ठेवले आहेत. आता मराठा समाजाला सांगतो कुणाचेही बॉन्ड मी घेणार नाही. कारण जे निवडून येणार नाहीत तेसुद्धा बॉन्ड द्यायला लागले आहेत. कुणीही लिहून दिले आणि तो पराभवातच जमा असेल तर काय फायदा? असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला.

