वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. अन्न, पाणी, औषधही न घेतल्याने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. आज (दि.२४) सकाळी त्यांनी आरोग्य पथकातील डॉक्टरांना तपासणी करण्यास नकार दिला. त्यामुळे समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
डॉक्टरांचे पथक तपासणी न करता परत गेले. तर दुपारच्या सत्रातील आरोग्य पथक आरोग्य तपासणी करू द्या, अशी विनंती करत होते. मात्र, तपासणीसाठी जरांगे यांनी स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे आता त्यांचा बीपी किती आहे? शुगर किती आहे? ताप किती आहे? पल्स किती आहेत? याबाबत मराठा समाजासह सर्वांच्या मनात धाकधूक वाढली आहे. आंदोलक महिलांकडून जरांगे यांना पाणी आणि आरोग्य तपासणी करून उपचार घेण्याची विनंती केली.
जरांगे यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आज सकाळी ९ वाजता जिल्हा आरोग्यपथक व्यासपीठावर दाखल झाले. केवळ बीपी तपासणी तरी करून देण्याची विनंती आरोग्य पथकातील डॉक्टरांनी केली. मात्र, त्यांनी त्यास विरोध केला. दरम्यान, उपोषणाच्या सातव्या दिवशी सोमवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास जरांगे बाथरूममध्ये जात असताना भोवळ येवून कोसळले होते. त्यांचा बीपी कमी झाला होता. मात्र, उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिला होता.