

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी पुढील आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. आपण तर पुन्हा उपोषणास बसणार आहोत, असा पवित्रा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी घेतला आहे. गरज पडल्यास सामूहिक उपोषणाला बसण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले. याबाबत त्यांनी सोमवारी पत्रपरिषदेत माहिती दिली.
आंदोलनाची तयारी आजपासूनच सुरू झाली आहे. समोर कोणीही येऊ द्या. हा मराठा तुम्हाला लढून गुडघ्यावर टेकवणार आहे. मराठ्यांना हरवण्याची ताकद कोणातही नाही, तुमचा गेम करणार आहोत. आरक्षण आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. आरक्षणामुळे लेकरा बाळांच्या चेहऱ्यावर आनंद दिसणार आहे. राजकारणामुळे पक्षाच्या नेत्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल. राजकारण म्हणजे गटारासारखा खेळ आहे.
एकदा वेड लागले की डोक्यातून निघत नाही. ते मराठा समाजाने डोक्यातून काढून टाकले पाहिजे, आपल्याला पुढच्या लढ्याची तयारी करायची आहे. कोणी लिहून दिले किंवा नाही दिले तरी आपल्याला लढावेच लागणार आहे, असे ते म्हणाले. आम्ही सध्या सामूहिक उपोषणाच्या तयारीला लागले आहोत, राज्यभरातील सर्व मराठा अंतरवाली सराटीमध्ये सामूहिक उपोषण करणार आहेत. आता एकच हातोडा हाणायचा आणि शेवटची फाईट आहे.
फडणवीस यांना सरकार आणि भाजपमध्ये मराठ्यांचे लोक नको आहेत. उमेदवाराकडून लिहून घेण्यापेक्षा किंवा व्हिडिओ करण्यापेक्षा, त्या भानगडीत पडू नये. तुमच्या मदतीला जो येईल त्याला दनादन मतदान करा. आपल्या लेकरांचे वाटोळ करणाऱ्याला, आपल्या आरक्षणाला विरोध करणाऱ्याला पाडायचे, असे ते म्हणाले. जरांगे यांनी नितेश राणे यांच्यावरही टीकास्त्र सोडले.