

Manoj Jarange Patil criticizes Deputy Chief Minister Ajit Pawar
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा :
छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली किंवा नाही घेतली हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. छगन भुजबळ मंत्री झाले याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही. भूजबळ यांना मंत्रिपद दिल्याने मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली असून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलताना मराठा आंदोलक जरांगे पाटील म्हणाले, अजित पवार प्रचंड मोठी चूक करत आहेत. याच्या परिणामाला त्यांना सामोरे जावं लागेल, असा थेट इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
जे मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करत आहेत, त्यांना सरकारमध्ये मंत्रिपद दिलं जात आहे. आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आल्याने छगन भुजबळांना तात्पुरता आनंद दिला असेल. छगन भुजबळांच्या आनंदावर शंभर टक्के विर्जन पडेल. अजित पवार जातीयवादी लोकं पोसण्याच काम करत आहेत, याची किंमत त्यांना मोजावी लागेल अशी टीका त्यांनी यावेळी केली.
छगन भुजबळ यांना मंत्रिपद देऊ नका असा विरोध अजित पवारांच्या सगळ्या आमदारांनी करायला पाहिजे होता. भुजबळांना मंत्रिपद देण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असू शकतात असंही मनोज जरांगे यांनी टीका केली.