वडीगोद्री : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी येत्या २४ तारखेला पुन्हा इच्छुक उमेदवारांची बैठक बोलावली आहे. जरांगे यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकलंय. त्यानुसार जरांगे यांच्याकडून जिल्ह्याजिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. बऱ्याच मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळं तोडगा काढून सक्षम उमेदवार उभा करण्यासाठी जरांगे इच्छुक उमेदवारांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळं सर्वांनी आपआपले मतभेद बाजूला ठेवून २४ तारखेला अंतरवाली सराटीत चर्चा करण्यासाठी यावे. असे मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे पञकारांशी बोलताना म्हणाले.
दरम्यान, काही ठराविकच मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. या अगोदर आम्ही महाराष्ट्रातील इच्छुकांची बैठक घेतली होती. ती बैठक लढायचं की पाडायचं याविषयी होती. त्यावेळी आम्ही सांगितलं होतं. एका मतदारसंघात एकच उमेदवार द्या. तुमच्या मतदारसंघात तुमच्या बैठका घ्या. येत्या २४ तारखेला अंतरवाली सराटीमध्ये जिल्ह्यानुसार बैठक घेऊन मी स्वत: बसून एक उमेदवार देण्याचा प्रयत्न करेन,असे जरांगे म्हणाले.
सगळ्यांनी फॉर्म भरले तर ते किचकट होईल. एका मतदार संघातून एक उमेदवार दिला तर ताकत लावता येईल. आपण त्या मतदार संघात एकच फॉर्म ठेऊ आणि बाकीचे काढून घेऊ असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले ज्यांना फॉर्म काढून घ्यायला सांगण्यात येईल त्यांनी फॉर्म काढून घ्यावा, जर एखाद्या मतदारसंघात सांगूनही फॉर्म ठेवला तर त्याने मुद्दाम फॉर्म ठेवला आणि मॅनेज झाला, त्याला मराठ्यांशी काही देणे -घेणे नाही असं मानण्यात येईल. मी आज आणि उद्या कोणते उमेदवार द्यायचे याची यादी करत आहे, पण डिक्लेअर करणार नाही. माझी विनंती आहे की, येत्या २३ तारखेपर्यंत मला कोणीही भेटायला येऊ नका. असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
ज्या देवेंद्र फडणवीसांनी आपल्या लेकरांच्या डोळ्यात पाणी आणलं.आपल्या लेकरांच्या डोळ्यातून रक्त काढलं. मराठा समाजाला हीन वागणूक दिली. त्यांना मतदान करायचं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या आईबापाचं मतदान घेतलं पण आरक्षण दिलं नाही, असेही यावेळी जरांगे पाटील बोलताना म्हणाले.