वडीगोद्री : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे गुरुवारी विविध समाजांच्या धर्मगुरूंशी संवाद साधणार आहेत. अर्ज भरण्याची मुदत संपताच जरांगे सक्रिय झाले असून, मुस्लिम आणि बौद्ध धर्मगुरूंसोबत अंतरवाली सराटी येथे चर्चा होणार आहे. यानंतर दोन नोव्हेंबर म्हणजेच दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधून निवडणुकीत उमेदवारी जाहीर करायची की नाही, याबाबतचा निर्णय जरांगे घेणार आहेत.
मराठा, दलित, मुस्लिम या समाजांचे समीकरण जुळवण्यासाठी समग्र चर्चा होणार आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता बैठक सुरू होईल. त्यामुळे इच्छुक उमेदवार, अपक्ष उमेदवार, पक्षाचे उमेदवार कोणीही तूर्त अंतरवाली सराटीत येऊ नये असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.
दरम्यान, जरांगे यांची प्रकृती बुधवारी अचानक बिघडली. रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या भेटीगाठी आणि झोप नीट होत नसल्याने त्यांना थकवा जाणवू लागला आहे. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना आराम करायचा सल्ला दिला आहे.