Jalna News : आयुक्त खांडेकर यांच्या सह्यांचे सव्वा कोटीचे धनादेश रद्द, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
जालना : लाचखोर मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांच्या सह्यांचे सुमारे सव्वा कोटींचे धनादेश रद्द करण्यात आले आहे. ही कारवाई जालना शहर महानगर पालिकेच्या प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केली.
दरम्यान, १० लाख रुपयांची लाच घेताना मनपा आयुक्त संतोष खांडेकर हे लाचेच्या जाळ्यात अडकले आहे. यामुळे त्यांच्या कार्यकाळात झालेली अनेक विकासकामे संशयाच्या भोवऱ्यात आली आहेत. विविध कामे केलेली बिले काढण्यासाठी अनेकांचे चेक लेखा विभागाकडे आलेले आहेत. त्या धनादेशावर संतोष खांडेकर यांच्या सह्या होऊन बिले मंजूर करण्यासाठी लेखा विभागाकडे पडून आहेत.
परंतु, आयुक्त म्हणून कामकाज पाहणाऱ्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी मनपा कार्यालयात सोमवारी (दि.27) जाऊन कामकाजाचा आढावा घेतला. त्यांनी खांडेकर यांच्या सह्यांचे जवळपास सव्वा कोटींचे चेक रद्द केले आहेत. कंत्राटदारांना पुन्हा नव्याने चेक सादर करुन विले काढण्यासाठी लेखा विभागाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे. कंत्राटदारांकडून ज्या कामांची बिले दाखल झाली आहेत त्या विविध कामांची तपासणी केली जाणार आहे. त्या कामांबाबत सर्वतोपरी पाहणी केली जाणार आहे. झालेल्या कामांची गुणवत्ता पाहून बिले दिले जाणार आहेत. १ ते १० लाखांची सुध्दा काही किरकोळ कामे आहेत. परंतु, या दाखल झालेल्या बिलांचीही चौकशी केली जाणार आहे.

