

जालना ः बदनापूर शहरातील आंबेडकर नगर परिसरात आयोजित एका हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या किरकोळ कारणावरून वाद होऊन एका 24 वर्षीय तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अविनाश कचरु बोर्डे (रा. गैबीशहावलीनगर) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 12 मे) रात्री 10 वाजेच्या सुमारास आंबेडकर नगर येथे अविनाश बोर्डे हा त्याचा मित्र जितेष साबळे याच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी गेला होता. या कार्यक्रमात डीजेच्या तालावर सर्वजण नाचत असताना, आरोपी तुषार रामेश्वर दिवे याने अविनाशची कॉलर धरून त्याला नाचण्यासाठी ओढले. मात्र, ‘मला नाचायला जमत नाही, तुम्ही तुमचा कार्यक्रम करा,’ असे अविनाशने सांगताच तुषारचा राग अनावर झाला.
नाचण्यास नकार दिल्याने चिडलेल्या तुषारने तत्काळ त्याचा चुलत भाऊ अनिकेत अनिल दिवे याला फोन करून बोलावून घेतले. अनिकेतने घटनास्थळी येताच आपल्याकडील स्टीलचा चाकू काढून तुषारच्या हातात दिला.
काही समजण्याच्या आतच तुषारने अविनाशच्या डोक्यात चाकूने वार केले. भांडण सुरू असल्याचे पाहून उपस्थित असलेल्या अजय साबळे, रितेष साबळे, करण साबळे आणि रोहित मगरे यांनी मध्यस्थी करून वाद सोडवला. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या अविनाशला तातडीने बदनापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.