

घनसावंगी ः खरीप हंगाम 2026 च्या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत तालुक्यातील कोठाळा बु. येथे खरीप हंगामपूर्व जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी उप कृषी अधिकारी संजय लोंढे यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत शेती पद्धती तसेच कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी बीबीएफ (ब्रॉड बेड फर्रो) पद्धतीवर पेरणी, उताराला आडवी पेरणी तसेच जलसंधारणाच्या उपाययोजनांचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे संजय लोंढे यांनी सांगितले. या पद्धतीमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरते, मातीची धूप कमी होते तसेच कमी पावसातही पिकांना आवश्यक ओलावा टिकून राहण्यास मदत होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
सोयाबीन पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासणी व बीज प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी ट्रायकोडर्मा, अझोटोबॅक्टर व पीएसबी यांसारख्या जैविक घटकांच्या वापराचे महत्त्व पटवून दिले. या घटकांमुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होत असून रासायनिक औषधांवरील खर्च कमी होतो, असे त्यांनी नमूद केले.
ऊस पाचट जाळण्याऐवजी त्याचा शेतात आच्छादन म्हणून वापर केल्यास जमिनीतील ओलावा टिकून राहतो, तणांचे प्रमाण कमी होते व सेंद्रिय कार्बन वाढण्यास मदत होते, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच ठिबक व तुषार सिंचन, पावसाच्या पाण्याचे साठवण व शेततळ्यांचा प्रभावी वापर करून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सहायक कृषी अधिकारी किरण घादगिणे यांनी फळबाग लागवडीसाठी सीआरए (क्लायमेट रेसिलियंट ॲग्रीकल्चर) तंत्रज्ञान, शून्य मशागत, सापळा पिकांची लागवड, हिरवळीच्या खतांचा वापर तसेच जीवामृत व बीजामृत यांच्या प्रभावी वापराबाबत माहिती दिली. तसेच शंखी गोगलगाय नियंत्रणासाठी चिकट सापळे, पक्षी थांबे व ट्रायकोडर्माचा वापर ही एकात्मिक किड व्यवस्थापनातील प्रभावी साधने असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविस्तार ॲपचा प्रभावी वापर करा
कृषी विभागामार्फत ‘महाविस्तार एआय’ ॲपचा प्रभावी वापर करण्याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. हवामान अंदाज, बाजारभाव, रोग-किड नियंत्रण तसेच विविध योजनांची माहिती या ॲपद्वारे सहज उपलब्ध होत असल्याने डिजिटल शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे संजय लोंढे यांनी सांगितले.