Jalna News : जिल्हा परिषद शाळांमधील ४०५ वर्गखोल्या धोकादायक
आप्पासाहेब खर्डेकर
जालना : गेल्या अनेक वर्षांपासून विद्यादान करणाऱ्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या १४९४ शाळा आहेत. या शाळांमधील ४०५ वर्गखोल्यांची काळानुरूप पडझड झाल्याने त्या खोल्या धोकादायक झाल्या आहेत. ह्या वर्गखोल्या विद्यार्थ्यांसाठी बसण्यायोग्य नाहीत. अनेक शाळामध्ये एका वर्गखोलीत दोन ते तीन वर्ग बसविण्यात येत आहे. शिक्षण विभागाने लक्ष घालून वर्गखोल्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम सुरू केला. या उपक्रमातून वाचन आनंद दिवस, ज्ञान रचनावाद, डिजिटल शाळा, अक्षर सुधार कार्यक्रम असे विविध उपक्रम साजरे करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थी शहरातील खासगी शाळांच्या विद्याथ्यपिक्षाही स्मार्ट व्हाव्यात यासाठी जिल्ह्यात शिक्षण विभागाने विविध उपक्रम राबविले. परंतु अपुऱ्या निधीमुळे व दुर्लक्षामुळे जिल्हा परिषदेच्या ४०५ वर्गखोल्या ज्ञानार्जनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत धोकादायक आहेत. अनेक शाळा तर वर्षानुवर्षापासून पडक्या स्वरूपात पडून आहेत. या शाळेत विद्यार्थी शिक्षणाते धडे घेत आहे. अशा शाळांची तत्काळ दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
नवीन वर्गखोल्यांना मंजुरी नाही
जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुक्याकडून धोकादायक वर्गखोल्यांची माहिती मागविली होती, त्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या सुमारे ४०५ वर्गखोल्या धोकादायक असल्याची माहिती पुढे आली आहे. मागील वर्षी नवीन वर्ग खोल्यांच्या बांधकामांसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले होते. जिल्हा परिषद शाळांमध्ये नवीन वर्गखोल्या बांधकामास मंजुरी देण्यात आलेली नाही. गेल्या वर्षी दोन वर्ग खोल्या बांधण्यात आल्या.
गेल्या अनेक वर्षापासून शाळेची दुरवस्था झालेली आहे या संदर्भात शिक्षण विभागाकडे वेळोवेळी पाठपुरा करूनही दुर्लक्ष केले आहे चिमुकल्याच्या जीवाशी खेळ केले जात आहे या शाळेत बहुतांश मुले गरिबांची आहे यांचे कुठे तरी विचार व्हायला हवा. लवकर शाळेची दुरुस्ती करावी अन्यथा येथे दुर्घटना घडल्यास त्याला कोण जवाबदार राहणार आहे.
सुभाष सुरडकर, उपाध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती,
