Jalna yellow alert : जिल्ह्यात 12 व 13 रोजी यलो अलर्ट

जालन्याच्या तापमानाचा पारा 43 वर, प्रशासनाचा अलर्ट मोडचा इशारा, रस्त्यावर गर्दी कमी
Jalna yellow alert
Jalna yellow alertpudhari photo
Published on
Updated on

जालना: भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यासाठी 12 व 13 मे रोजी ‌‘यलो अलर्ट‌’ जारी करण्यात आला आहे. या कालावधीत उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.दरम्यान मंगळवारी जालन्याच्या तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअसवर गेल्याचे दिसून आले.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच मैदानी काम करणाऱ्या कामगारांनी अधिक दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उष्माघात टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिणे, तहान नसली तरी नियमित पाणी सेवन करणे आणि फळांचे रस, ओआरएस, लिंबूपाणी, ताक यांसारख्या द्रव पदार्थांचा आहारात समावेश करावा. तसेच बाहेर पडताना डोक्यावर टोपी, गमछा किंवा छत्रीचा वापर करावा तसेच हलक्या रंगाचे, सैल व सुती कपडे परिधान करावेत.

उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी शक्यतो सावलीत विश्रांती घ्यावी. कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी तसेच मधून-मधून विश्रांती घेऊन शरीराचे तापमान नियंत्रित ठेवावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.

प्रशासनाने नागरिकांना उष्माघाताची लक्षणे ओळखण्याचे आवाहन केले असून, चक्कर येणे, डोकेदुखी, अशक्तपणा, जास्त घाम येणे किंवा घाम अचानक बंद होणे, त्वचा लाल होणे, उलटी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय मदत घ्यावी. नागरिकांनी उष्णतेच्या काळात चहा, कॉफी, मद्य किंवा कॅफिनयुक्त पेयांचे अतिसेवन टाळावे. तसेच उच्च प्रथिनेयुक्त व शिळे अन्न खाणे टाळावे. पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी ठेवू नयेत, असेही आवाहन केले आहे.तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअसवर गेल्याने उष्णतेची लाट पसरली होती.

या क्रमांकाशी संपर्क करा

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मोबाईल क्र 9404548317 संपर्क साधावा. तसेच आरोग्य विभाग जिल्हा परिषदेच्या टोल फ्रि क्रमांक 104 वर संपर्क साधून नजीकच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news