

जालना : बिपरजॉय वादळ आणि मान्सूनपूर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जिल्ह्यासाठी पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात आजपासून पुढील चार दिवस म्हणजेच 11 जूनपर्यंत वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय व आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान अंदाजानुसार, आज 8 जून रोजी जिल्ह्यात सर्वाधिक धोका असून, मेघगर्जनेसह वादळ आणि वीज पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
पुढील 5 दिवसांचा अंदाज
दिनांक - हवामान अंदाज
08 जून - मेघगर्जनेसह वादळ, वीज पडण्याची शक्यता, हलका ते मध्यम पाऊस आणि 30-40 किमी/तास वेगाने वारे.
09 जून - हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जना.
10 जून - हलका पाऊस आणि गडगडाटी सरी.
11 जून- हलका पाऊस आणि गडगडाटी सरी कायम राहतील.
12 जून- पाऊस ओसरेल, हवामान पूर्णपणे कोरडे राहील.