

पांगरी ः मंठा तालुक्यातील वाई ग्रामपंचायत अंतर्गत मोठ्या प्रमाणात अनियमीतता झाल्याची तक्रार आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.
तक्रारदार यांनी 2 जानेवारीला जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तक्रार दिल्यानंतर 20 मार्च रोजी चौकशी करण्यासाठी मंठा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बी. बी. चव्हाण हे वाई येथे आले होते. परंतु यावेळी काही व्यक्तीनी गोंधळ घातल्याने चौकशी अधिकारी परत गेले होते.
त्या नंतर 1 एप्रिल रोजी चौकशी अधिकारी तथा विस्तार अधिकारी बी. बी. चव्हाण हे सकाळी 11 वाजता वाई ग्रामपंचायत मध्ये आले. त्या वेळी तक्रारदारां समक्ष त्यांनी चौकशी केली. पोषण आहार, सार्वजनिक कचरा कुंडी, अंगणवाडी साहित्य खरेदी, घनकचरा प्रकल्प, सौर ऊर्जा मोटर आदींचीही त्यांनी पाहणी केली.
यावेळी पोषण आहार, सार्वजनिक कचरा कुंडी, घनकचरा प्रकल्प, सौर ऊर्जा मोटर यामधे अनियमितता आढळून आल्याचे समजते. उर्वरित चौकशी 2 एप्रिल रोजी होणार असल्याचे चौकशी अधिकारी विस्तार अधिकारी बी. बी. चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान वाई ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामाची निःपक्षपाती सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली असून निःपक्षपाती चौकशी केली नाही तर वरिष्ठांकडे अपील करणार असल्याचे तक्रारदारांनी सांगितले.
सौर ऊर्जा नाहेी
वाई ग्रा. प. अंतर्गत सौर ऊर्जा मोटर पंपाची चौकशी करण्यासाठी अधिकारी व तक्रारदार घटनास्थळी ग्रामसेवकासह गेले असता तेथे सौर ऊर्जा मोटर ऐवजी विद्युत मोटार व स्टार्टर आढळून आले. सौर ऊर्जा मोटर नसल्याचे प्रत्यक्षदर्शी आढळून आल्याने या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी होत आहे.