

परतूर : परतूर रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या संरक्षक भिंतीवर भरधाव वेगातील दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली आहे. बळीराम लक्ष्मण काकडे, गजानन दादाराव मोरे रा. दोघेही कोरेगाव अशी मृतांची नावे आहेत. अपघातातील मृत दोघे मित्र असून रात्री दोन वाजेच्या सुमारास साईबाबा मंदिर चौक ते उड्डाणपूल रस्त्यावरून दुचाकीने भरधाव वेगाने जात होते.
रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या वळणावर दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने त्यांची दुचाकी भरधाव वेगात संरक्षण भिंतीवर आढळली. या अपघातात दोघेही गंभीररीत्या जखमी झाले. परिसरात उपस्थित नागरिकांनी दोघांना परतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृत बळीरामचे वडील लक्ष्मण विठ्ठलराव काकडे यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.