

Jalna Police Attacked Stone Pelting on Gondi Police
शहागड : अंबड तालुक्यातील गोंदी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक किरण हावले जमादार अशोक नागरगोजे, जमादार चरणसिंग बामणवात, पोलिस कर्मचारी शाकेर सिद्दिकी यांच्यावर २ पुरुष व एका महिलेने तुफान दगडफेक केली. ही घटना गोंदी तांडा ( वैतागवाडी) येथील वडार वस्तीवर आज (दि. १७) सकाळी ११ वाजता घडली. दुचाकी चोरीच्या घटनेतील संशयित आरोपीला घरातून ताब्यात घेण्यासाठी पोलिस गेले असता हा प्रकार घडला.
यावेळी पोलिस कर्मचारी शाकेर सिद्दिकी यांना डाव्या हाताल दगड लागला. तर अशोक नागरगोजे यांच्या पायाला दगड लागला. तर पकडलेला आरोपी सुटला. उपनिरीक्षक किरण हावले यांच्या कारवर (एम.एच.25 बी.ए.2226) तिघांनी दगडफेक केली. यात कारची मागील काच फुटली. दरम्यान, दगडफेक करणारे तिघेजण पळून गेले आहेत. जखमी पोलिसांवर शहागड प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. वैष्णवी नरवडे यांनी उपचार केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी पसार झालेल्या तिघांचा शोध सुरू केला आहे. अंबड, घनसावांगी, गोदी, शहागड येथील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त फौजफाटा गोंदी येथे बोलवला होता.