

जालना : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 10 वीच्या परीक्षेत जालना जिल्ह्याचा निकाल यंदा 91.94 टक्के लागला आहे. गेल्या दोन वर्षांतील जिल्ह्याची कामगिरी पाहता, यंदा निकालाच्या टक्केवारीत 3.55 टक्के इतकी घट झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यात इयत्ता दहावीचा या वर्षीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात मुलीचींच सरशी पाहायला मिळत आहे. उत्तीर्ण मुलांचा निकाल हा 82.44 टक्के तर उत्तीर्ण मुलींचा निकाल हा 92.32 इतका आहे. म्हणजे मुलांच्या तुलनेत तो सुमारे 9.88 इतका वाढला आहे.
गेल्या तीन वर्षांतील कामगिरी पाहिल्यास निकलात चढ-उतार दिसून येत आहे. सन 2023 मध्ये जिल्ह्याचा निकाल 93.25 टक्के होता, जो 2024 मध्ये 94.99 टक्क्यांपर्यंत वधारला होता. मात्र, 2025 च्या निकालात सुमारे 3.55 टक्क्यांची मोठी घट होऊन हा निकाल 91.44 टक्क्यांवर आला आहे.
यावर्षी जालना जिल्ह्यातून एकूण 31 हजार 775 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 31 हजार 585 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला प्रविष्ट झाले. निकाल जाहीर झाल्यानंतर त्यातील 28 हजार 883 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याची एकूण टक्केवारी 91.44 इतकी राहिली आहे.
2021 मध्ये कोविड काळातील मूल्यमापनामुळे जिल्ह्याचा निकाल उच्चांकी 99.97 टक्क्यांवर होता.2024 मध्ये 31 हजार 778 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, जी गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक संख्या होती.
छत्रपती संभाजीनगर विभागातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जालना जिल्हा आपले स्थान टिकवून आहे. यंदाच्या निकालात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, ग्रामीण भागातील शाळांनीही उत्तम कामगिरी बजावली असल्याचे चित्र आहे.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येत तफावत
2024 मध्ये जालन्यातून 30,186 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते, मात्र 2025 मध्ये नोंदवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ तेवढीच असूनही उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आकडा 28,883 पर्यंत खाली आला आहे. विभागातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जालना जिल्ह्याची कामगिरी काहीशी मागे पडल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.