

जालना ः मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत जालना जिल्ह्यात सौरऊर्जेच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. या योजनेकरीता जिल्ह्यातील एकूण 50 उपकेंद्रांसाठी 693 हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यावर सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील कृषी वीजपुरवठ्याला शाश्वत व पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होणार आहे.
या योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यात आतापर्यंत 17 ठिकाणी 84 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वीरीत्या कार्यान्वित करण्यात आले आहेत. या प्रकल्पांमुळे संबंधित उपकेंद्रांवरून जोडलेल्या शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळू लागला असून, सिंचनासाठी रात्रीची गैरसोय कमी झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात घट होऊन उत्पन्न वाढीस हातभार लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
याशिवाय जिल्ह्यातील 32 उपकेंद्रांसाठी सुमारे 152 मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी सुरू असून हे काम सध्या विविध टप्प्यांत प्रगतीपथावर आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कृषी पंपांना सौरऊर्जेवर आधारित वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पारंपरिक वीज निर्मितीवरील अवलंबित्व कमी होऊन ऊर्जा बचत होणार आहे.
हरित ऊर्जेला मिळेल चालना
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मुळे केवळ वीजपुरवठाच सक्षम होणार नाही, तर हरित ऊर्जेला चालना मिळणार आहे. पर्यावरण संरक्षण, कार्बन उत्सर्जनात घट आणि शाश्वत विकास या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जिल्ह्यात सौरऊर्जेच्या माध्यमातून कृषी क्षेत्राचा विकास साधण्याच्या दिशेने जालना जिल्हा अग्रस्थानी राहील, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.